धनत्रयोदशीला सोने खरेदी राहणार जोरात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 08:13 PM2020-11-11T20:13:18+5:302020-11-11T20:17:24+5:30
Gold Nagpur News कोरोना नियमांचे पालन करीत ग्राहकांच्या सुविधेसाठी सराफांनी शोरूमची सजावट केली केली आहे. ग्राहकांनी आतापासून खरेदीची तयारी केली असून, दिवाळीसह लग्नाची खरेदी याचदिवशी वाढणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धनत्रयोदशीच्या दिवशी सोने किंवा चांदीची नाणी खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. कोरोना नियमांचे पालन करीत ग्राहकांच्या सुविधेसाठी सराफांनी शोरूमची सजावट केली केली आहे. ग्राहकांनी आतापासून खरेदीची तयारी केली असून, दिवाळीसह लग्नाची खरेदी याचदिवशी वाढणार आहे. यंदा धनत्रयोदशीला सोने खरेदी जोरात राहील, असा अंदाज सराफांनी व्यक्त केला आहे.
कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या त्रयोदशीच्या तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. यावर्षी १३ नोव्हेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीचा दिवस हा धन्वंतरी त्रयोदशी म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी कोणतीही वस्तू, सामान किंवा संपत्ती खरेदी केल्यास त्याला धनाच्या देवतेचा आशीर्वाद लाभतो. या दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरीचीही पूजा केली जाते. देवी लक्ष्मीची आणि गणपतीची मूर्ती खरेदी करून दिवाळीच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते.
सराफा म्हणाले, गेल्या सव्वा महिन्यापासून सोने आणि चांदीचे दर स्थिर आहेत. यापुढे दर वाढणार नाहीत, ही बाब ग्राहकांना समजल्याने ते खरेदीसाठी शहरातील मोठ्या शोरूम आणि दुकानांमध्ये जात आहेत. अनेकांनी दागिन्यांचे बुकिंग केले असून, धनत्रयोदशीला सोने घरी नेणार आहेत. बुधवारी १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५१,२०० रुपये तर एक किलो चांदीचे दर ६३ हजार रुपये होते. दर स्थिर असल्याने ग्राहकांसमोर खरेदीचे अनेक पर्याय आहेत. या दिवशी लोक १ ग्रॅमपासून १० ग्रॅमपर्यंत सोने खरेदी करतातच. याकरिता सराफांनीही तयारी केलीे आहे. अनेक जण लग्नासाठी याच दिवशी दागिने खरेदी करणार आहेत. यानिमित्ताने सोन्याचे कमी ग्रॅमचे दागिने, नाणे, आकर्षक डिझायनर दागिने शोरूममध्ये प्रदर्शित केले आहेत.
सराफांनी आणलेल्या योजनांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. ज्या दिवशी दागिन्यांची बुकिंग केले त्या दिवशीचे दर आणि दागिने नेत असलेल्या दिवशीचे दर यात ज्या दिवशीचा भाव कमी असेल तेच दर ग्राहकांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे बुकिंग वाढल्याचे सराफांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीच्या तुलनेत यंदा सोन्याचे दर १४ हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यानंतरही ग्राहकांनी सोन्याची खरेदी वाढविल्याचे बाजारात चित्र आहे. सराफा म्हणाले, जवळपास सात महिन्यानंतर सराफा व्यवसायात उत्साह संचारला आहे. ग्राहकांच्या खरेदीमुळे सराफांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीत शुभमुहूर्तावर लोकांनी गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करावी, असे सराफांनी स्पष्ट केले.