सोनसाखळी, वाहन चोरी : अट्टल गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 10:39 PM2020-08-25T22:39:39+5:302020-08-25T22:41:33+5:30
नागरिकांचे दागिने हिसकावून नेणारा तसेच मोटरसायकल चोरणारा अट्टल गुन्हेगार आकाश फुलचंद इरपाते (वय ३५) याच्या मुसक्या बांधण्यात बेलतरोडी पोलिसांनी यश मिळविले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने तसेच दुचाकीसह ६ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांचे दागिने हिसकावून नेणारा तसेच मोटरसायकल चोरणारा अट्टल गुन्हेगार आकाश फुलचंद इरपाते (वय ३५) याच्या मुसक्या बांधण्यात बेलतरोडी पोलिसांनी यश मिळविले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने तसेच दुचाकीसह ६ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
कुख्यात इरपाते दिघोरीच्या रामकृष्ण नगरात राहतो. सकाळी, सायंकाळी फिरायला निघालेल्या महिला, पुरुषांचे दागिने हिसकावून घेण्यात आरोपी इरपाते सराईत आहे. सोनसाखळी चोरण्यासोबतच तो दुचाक्याही चोरतो. त्याने आतापर्यंत शहरातील विविध भागात अशाप्रकारचे १० गुन्हे केलेले आहेत. ११ ऑगस्टला सायंकाळी बेलतरोडीतील अनिता ज्ञानेश्वर झाडे या महिलेची सोनसाखळी आरोपीने चोरली होती. त्याची तक्रार मिळाल्यानंतर बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू केला. तब्बल १२ दिवसानंतर आरोपीच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांनी यश मिळविले. त्याच्याकडून या गुन्ह्याचा उलगडा करतानाच पोलिसांनी अन्य ९ गुन्ह्यांचा छडा लावला त्यात चार गुन्हे बेलतरोडीचे, बजाजनगरातील एक, लकडगंजमधील एक, हुडकेश्वरमधील दोन आणि नंदनवनमधील एक गुन्ह्याचा समावेश आहे. या गुन्ह्यातील ५ ठिकाणचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, पाच हिरो होंडा स्प्लेंडर असा एकूण ६ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय आकोत, उपनिरीक्षक विकास मनपिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
आणखी गुन्हे उघड होणार
आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.