नागपुरात कोरोनाकाळात सोन्याचे नाणे, शुद्ध सोन्याला मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 09:01 PM2021-05-25T21:01:07+5:302021-05-25T21:02:39+5:30
Gold coin भारतीयांचे सोन्याविषयीचे प्रेम आणि आकर्षण सर्वश्रुत आहेच. विशेष प्रसंगांसह गुंतवणुकीसाठी सोने विकत घेणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या काळात गुंतवणूक म्हणून अन्य कोणत्याही साधनापेक्षा सोन्याच्या नाण्यांना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीयांचे सोन्याविषयीचे प्रेम आणि आकर्षण सर्वश्रुत आहेच. विशेष प्रसंगांसह गुंतवणुकीसाठी सोने विकत घेणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या काळात गुंतवणूक म्हणून अन्य कोणत्याही साधनापेक्षा सोन्याच्या नाण्यांना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय ब्रँडच्या सोन्याच्या नाण्यांमध्ये शुद्धता, दर्जा यांबरोबरच सरकारचा पाठिंबा, आदी बाबींचा अंतर्भाव असल्याने त्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. बँका आणि ब्रँडेड ज्वेलर्सच्या दुकानांमधून सरकारी सोन्याची नाणी विकत घेण्याचे प्रमाण अधिक आहे. ग्राहकांकडून प्रामुख्याने एक, दोन, पाच आणि दहा ग्रॅमच्या नाण्यांना मागणी अधिक आहे. कोरोनाकाळात गुंतवणूकदारांची ऑनलाईन खरेदी वाढली आहे. लग्नसराई आणि समारंभापुरतेच सोन्याचे नाणे मर्यादित राहिले नसून, त्याचा वापर भेटवस्तू म्हणून देण्याकडे कल वाढल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने म्हटले आहे.
नागपुरातील सराफा व्यापारी आणि सोने विक्रेते पुरुषोत्तम कावळे म्हणाले, कोरोनाच्या काळात सोन्याची ऑनलाईन विक्री सुरू आहे. त्यात ग्राहक नाणे, बिस्किटे आणि शुद्ध सोन्याची मागणी करीत आहेत. भविष्यात भाव वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूक म्हणून सोनेखरेदीकडे लोकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलले आहेत. त्यामुळे दागिने तयार करण्यासाठी आतापासूनच शुद्ध सोने खरेदी करीत आहेत. दागिन्यांची खरेदी ग्राहक हाताने पाहून, निरखून खरेदी करतात; पण आता दुकाने बंद असल्याने लोकांनी दागिने खरेदी थांबविली आहे. त्याऐवजी ते नाणे आणि शुद्ध सोने खरेदीवर भर देत आहेत. दुकाने बंद असल्याने सराफा व्यापाऱ्यांची स्थिती बिकट आहे. त्यांच्यावर अवलंबून असणारे हजारो कारागीर बेरोजगार झाले आहेत. याशिवाय बँकांच्या ओडी आणि सीसीवर व्याज चढत आहे. कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागत आहे. या सर्व परिस्थितीत सराफा व्यवसाय मंदीत आला आहे.
सराफा व्यापारी राजेश रोकडे म्हणाले, ग्राहक सध्या नाणे आणि शुद्ध सोन्याचे बुकिंग करीत आहेत. प्रत्यक्ष दागिने तयार करताना त्यांना भविष्यात सोने उपयोगात येणार आहे. मार्केट सुरू होईल तेव्हा ते दागिने घरी नेतील. लोक ऐपतीनुसार एक ग्रॅम नाण्यापासून खरेदी करीत आहेत. भाव वाढण्याची शक्यता असल्याने काही लोकांनी सोन्यात गुंतवणूक वाढविल्याचे बाजारात चित्र आहे. दुकाने बंद असल्याने व्यवसाय डबघाईस आला आहे. सराफा आणि ग्राहक दुकाने उघडण्याची वाट पाहत आहेत.