वर्षभरात सोने ८ हजारांनी वाढले; जीएसटीसह ६५ हजारांवर!
By मोरेश्वर मानापुरे | Published: December 26, 2023 09:32 PM2023-12-26T21:32:10+5:302023-12-26T21:32:34+5:30
- चांदीत ७,२०० रुपयांची वाढ : गुंतवणूक म्हणून सोने खरेदी वाढली
नागपूर : वर्षभरात शुद्ध दहा ग्रॅम सोन्याचे दर ८,७०० रुपयांनी वाढले असून बाजारात ३ टक्के जीएसटीसह भाव ६५,३०० रुपयांवर पोहोचला आहे. भाव वधारल्याने ग्राहक गुंतवणूक वा आवश्यक प्रसंगासाठीच सोन्याची खरेदी करीत असल्याचे सराफांचे मत आहे.
तुलनात्मकरीत्या २६ डिसेंबर २०२२ रोजी शुद्ध सोन्याचे दर ५४,७०० रुपये होते. तर २६ डिसेंबर २०२३ पर्यंत ८,७०० रुपयांची दरवाढ होऊन भाव ६३,४०० रुपयांवर पोहोचले. ३ टक्के जीएसटीसह २६ डिसेंबरला भावपातळी ६५,३०० रुपयांवर पोहोचली. यंदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून आली. ४ डिसेंबरला सकाळच्या सत्रात सोन्याचे दर जीएसटी वगळता ६४,३०० रुपयांवर पोहोचले. तर सायंकाळी ६३,८०० रुपयांपर्यंत कमी झाले.
अशीच दरकपात चांदीच्या दरातही दिसून आली. सकाळच्या सत्राच्या ७९,३०० रुपयांच्या तुलनेत भाव सायंकाळी ७७,६०० रुपयांपर्यंत कमी झाले. ५ डिसेंबरला भाव आणखी कमी होऊन सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे ६२,८०० आणि ७६,१०० रुपयांपर्यंत कमी झाले. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीत दहा ग्रॅम शुद्ध सोने ६०,५०० रुपये आणि चांदीचे दर ७१,९०० रुपये, तर १ जुलै २०२३ रोजी सोने ५८,७०० आणि चांदीचे दर ७०,२०० रुपये होते.
सोने-चांदीचे दर :
सोने चांदी
२६ डिसें.-२०२२ ५४,७०० ६८,३००
१ जुलै-२०२३ ५८,७०० ७०,२००
२६ डिसें.-२०२३ ६३,४०० ७५,५००
(३ टक्के जीएसटी वेगळा)