चोरीच्या सोन्यावर घेतले ‘गोल्ड लोन’; गुन्हे शाखेने लावला छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 09:21 PM2022-03-24T21:21:57+5:302022-03-24T21:22:21+5:30
Nagpur News अल्पवयीन गुन्हेगारांनी हिसकावून नेलेली सोनसाखळी त्यांच्या साथीदारांनी फायनान्स कंपनीत गहाण ठेवून त्यावर गोल्ड लोन घेतले. या पैशातून त्यांनी चंगळ केली. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना हुडकून काढले.
नागपूर - अल्पवयीन गुन्हेगारांनी हिसकावून नेलेली सोनसाखळी त्यांच्या साथीदारांनी फायनान्स कंपनीत गहाण ठेवून त्यावर गोल्ड लोन घेतले. या पैशातून त्यांनी चंगळ केली. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना हुडकून काढले. सध्या ते पोलीस कोठडीची हवा खात आहेत.
अजनीच्या मित्रनगरात राहणारे दिनेश रामकृष्ण शाहू (वय ४५) हे १४ मार्चच्या रात्री ११.३० वाजता घरासमोर फिरत असताना पल्सरवर आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली. अजनी ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर परिमंडळ चारच्या पथकाने त्याचा समांतर तपास करून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, ते अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या दोघांनी चोरलेली सोनसाखळी त्यांचा साथीदार शेख शहबाज शेख फारुख (वय २०, रा. मोठा ताजबाग) याच्याकडे दिली. शहबाजने त्याच्या मैत्रिणीला ती गोल्ड फायनान्स कंपनीत गहाण ठेवून त्यावर ५१ हजाराचे कर्ज उचलले. या रकमेची आरोपींनी आपसात हिस्सेवाटणीही केली. हा घटनाक्रम उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी शहबाजला अटक करून त्याच्याकडून सहा हजार रुपये जप्त केले. पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, सहायक निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, उपनिरीक्षक निरंजना उमाळे, हवालदार रवींद्र पानबुडे, बबन राऊत, अंमलदार युवानंद कडू, पुरुषोत्तम काळमेघ, दीपक चोले, नीलेश ढोले, आतिश क्षीरसागर, सतीश ठाकरे, स्वप्निल अमृतकर, महेश काटवले आणि लीलाधर भेंडारकर यांनी ही कामगिरी बजावली.
दोन गुन्हे उघड
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस वर्तवीत आहेत.
------