मेडिकलच्या प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:55+5:302021-08-22T04:11:55+5:30
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) माजी विद्यार्थ्यांची संघटना ‘ॲल्युमिनी असोसिएशन’च्यावतीने प्रावीण्यप्राप्त सात विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन त्यांना गौरविण्यात आले. ...
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) माजी विद्यार्थ्यांची संघटना ‘ॲल्युमिनी असोसिएशन’च्यावतीने प्रावीण्यप्राप्त सात विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन त्यांना गौरविण्यात आले. शनिवारी मेडिकलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला खा. विकास महात्मे प्रामुख्याने उपस्थित होते.
वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मेडिकलच्या ॲल्युमिनी असोसिएशनतर्फे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, आयकर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे उपस्थित होते. मंचावर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, ‘ॲल्युमिनी असोसिएशन’चे सचिव डॉ. सुधीर नेरळ, उपाध्यक्ष डॉ. मनीष श्रीगिरीवार, हीरक महोत्सव आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी उपस्थित होत्या. कार्यक्रमाला ‘ऑनलाईन’द्वारे असोसिएशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. अशोक गुप्ता, डॉ. राजेंद्र अगरकर, डॉ. प्रफुल्ल कुळकर्णी, डॉ. रमेश बकाने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत गुरुऋण व समाजऋणाची जाणीव करून दिली. संचालन डॉ. मीना मिश्रा व डॉ. कविता धाबर्डे यांनी केले. आभार डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी मानले. कार्यक्रमाला मेडिकलचे हजारो माजी विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.
-या विद्यार्थ्यांना मिळाले पदक
अभिजित रघटाटे, पूजा घरडे, आकाश कोतवाल, स्वाती सुंधिया, तानिया रैना, रश्मी लाहोटी, अशिता आगाशे या विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.