पाच दिवसात सोने १,४०० तर चांदीत ५,८०० रुपयांची वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 09:04 PM2020-12-04T21:04:36+5:302020-12-04T21:06:41+5:30
Gold Nagpur News ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या पाच दिवसात १० ग्रॅम सोन्याचे दर १,४०० रुपये आणि चांदी किलोमागे ५,८०० रुपयांनी वाढून भाव अनुक्रमे ४९,९०० आणि ६४,५०० रुपयांवर पोहोचले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या पाच दिवसात १० ग्रॅम सोन्याचे दर १,४०० रुपये आणि चांदी किलोमागे ५,८०० रुपयांनी वाढून भाव अनुक्रमे ४९,९०० आणि ६४,५०० रुपयांवर पोहोचले आहेत. भाववाढीने ग्राहकांमध्ये संभ्रम पसरला असून आणखी भाव वाढण्याआधी ग्राहकांची खरेदी वाढल्याचे सराफांनी सांगितले.
३० नोव्हेंबरला सोने ४८,५०० रुपये तर चांदीचे भाव ५८,७०० रुपये होते. १ डिसेंबरला बाजार सुरू होताना सोने १०० रुपये वाढून ४८,६०० रुपये आणि चांदीत २,३०० रुपयांची वाढ होऊन भाव ६१ हजारांवर गेले. दुपारच्या सत्रात दोन्ही मौल्यवान धातूचे भाव वाढले. सोने १०० रुपये तर चांदीत ५०० रुपयांची वाढ झाली. शेवटच्या सत्रात सोन्यात पुन्हा २०० रुपये आणि चांदीत तब्बल १,५०० रुपयांची वाढ होऊन सोने ४९ हजार रुपये आणि चांदी ६३ हजारांवर स्थिरावली. २ डिसेंबरला दौन्ही मौल्यवान धातूच्या भावात वाढ झाली. सोने ५०० रुपयांनी वाढून ४९,५०० रुपये आणि चांदी एक हजाराने वाढून भाव ६४ हजारांवर गेले. ३ डिसेंबरला सोने २०० रुपयांची वाढून भाव ४९,७०० आणि चांदीचे भाव ६४ हजार रुपये स्थिर होते. तर ४ डिसेंबरला सोने पुन्हा २०० रुपयांनी वधारून भाव ४९,९०० रुपये आणि चांदी ५०० रुपयांनी वाढून ६४,५०० रुपयांवर गेली. अर्थात दिवाळीनंतर पाच दिवसात पहिल्यांदाच सोने आणि चांदीत अनुक्रमे १,४०० आणि ५,८०० रुपयांची वाढ झाली आहे.
नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, दिवाळीनंतर पहिल्यांदाच भाववाढ एवढी भाववाढ पाहायला मिळाली. दिवाळीनंतर काही दिवस भाव कमी झाले होते. त्यामुळे ग्राहक भाव आणखी कमी होण्याची वाट पाहत होते. पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडीमुळे देशांतर्गत स्थानिक बाजारपेठांमध्ये भाव वाढतच आहेत. पुढे असाच कल राहिल्यास भाव आणखी वाढतील.