एप्रिलमध्ये सोने १५८० रुपयांनी महाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:04+5:302021-04-26T04:07:04+5:30
नागपूर : लॉकडाऊनमुळे सराफा बाजार बंद असल्याने ग्राहकांना सोने-चांदीचे दर वाढले वा कमी झाले, याचा अंदाज येत नाही. पण ...
नागपूर : लॉकडाऊनमुळे सराफा बाजार बंद असल्याने ग्राहकांना सोने-चांदीचे दर वाढले वा कमी झाले, याचा अंदाज येत नाही. पण एप्रिल महिन्यात लॉकडाऊननंतर दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर १५८० रुपयांनी महाग होऊन ४७,८०० रुपयांवर पोहाेचले आहेत, तर प्रतिकिलो चांदीचे भाव ६९ हजार रुपयांवर गेले आहेत.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही लॉकडाऊनमुळे लग्नसमारंभ आणि अन्य मंगलकार्य बंद आहेत. त्यामुळे लोकांची सोन्याची खरेदी बंद आहे. सराफांच्या योजनेनुसार काही ग्राहक सोन्याचे बुकिंग करीत आहेत. लॉकडाऊन हटल्यानंतर त्यांना सोन्याची डिलिव्हरी मिळणार आहे. तसे पाहता आंतरराष्ट्रीय दरानुसार देशात स्थानिक बाजारात सोने व चांदीचे भाव कमीजास्त होतात. गेल्या आठवड्यात सोन्याचे भाव वाढून ४८,५०० रुपयांवर पोहोचले होते. नंतर एकाच दिवस घसरण झाली होती. सध्या सराफांना लॉकडाऊन हटून दुकाने सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. तेवढीच प्रतीक्षा ग्राहकांनाही आहे. सराफा व्यवसायात सोन्याच्या दागिन्यांची ऑनलाइन खरेदी कुणीही करीत नाही. तसा प्रयत्न काही सराफांनी केला होता. पण तो अपयशी ठरला. ग्राहक आकर्षक डिझाईन आणि दोन-चार दागिने हात लावून पाहिल्याशिवाय खरेदी करीत नाहीत. त्यामुळे लग्नसराईचे ग्राहक दुकाने उघडण्याची वाट पाहात आहेत.
सोन्याची आयात वाढली
भारत जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार देश आहे. मुख्यत्वे दागिने उद्योगांची मागणी पूर्ण करण्यासाठी सोने आयात करण्यात येते. दरवर्षी ८०० ते ९०० टन सोने आयात होते. गत आर्थिक वर्षात आयात २२.५८ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या बजेटमध्ये आयात शुल्क १२.५ टक्क्यांवरून १० टक्के केला आहे. याशिवाय गेल्यावर्षी रत्न आणि आभूषणांच्या निर्यातीत २७.५ टक्के घट झाल्याची नोंद आहे.