तीन आठवड्यात सोने ४,९००, तर चांदी ५२०० रुपयांनी वधारली, सणासुदीत ग्राहकांची खरेदी वाढली
By मोरेश्वर मानापुरे | Published: October 28, 2023 11:46 PM2023-10-28T23:46:17+5:302023-10-28T23:46:31+5:30
Gold-Silver Price: यंदा नागपुरात दिवाळीआधीच सोन्याने ६२ हजारांचा पल्ला गाठला आहे.
- मोरेश्वर मानापुरे
नागपूर - यंदा नागपुरात दिवाळीआधीच सोन्याने ६२ हजारांचा पल्ला गाठला आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात २४ दिवसात सोने ४,९०० रुपयांनी वधारून २८ ऑक्टोबरला ६१,९०० रुपये आणि चांदीत किलोमागे ५,२०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी ६८,४०० रुपयांच्या तुलनेत यंदा ७३,६०० रुपयांवर पोहोचली. दरवाढीनंतर ग्राहकांची पाऊले सराफांच्या दुकानाकडे वळू लागली आहेत.
गेल्यावर्षी २८ ऑक्टोबरला सोन्याचे दर ५१,३०० रुपये होते. तुलनात्मकरीत्या वर्षभरात १० ग्रॅम शुद्ध सोन्यात १०,६०० रुपयांची वाढ झाली. त्याचप्रमाणे गेल्यावर्षीच्या ५८,९०० रुपयांच्या तुलनेत चांदीत १४,७०० रुपयांची वाढ होऊन सध्या भाव ७३,६०० रुपयांवर पोहोचले आहेत. या दरावर ३ टक्के वेगळा जीएसटी आकारला जातो. त्यामुळे भाव आणखी वाढतात.
५ ऑक्टोबरला सोने ५७ हजार रुपये, तर चांदीचे किलो भाव ६८,४०० रुपये होते. त्यानंतर १० रोजी भाव ५८ हजार, चांदी ६९,६००, तर २० ऑक्टोबरला सोने ६१,२०० आणि चांदी ७४,१०० रुपयांवर पोहोचली. २३ ऑक्टोबरपर्यंत भाव स्थिर अर्थात सोने ६१,१०० आणि चांदीचे भाव ७३,३०० रुपयांवर होते. त्यानंतर सोन्याचे भाव दरदिवशी वाढतच आहेत. २६ रोजी ६१,४००, २७ रोजी ६१,७०० आणि २८ ऑक्टोबरला ६१,९०० रुपयांवर पोहोचले. ३ टक्के जीएसटी आकारता शनिवार, २८ रोजी ग्राहकाला १० ग्रॅम शुद्ध (९५.५ टक्के शुद्धता) सोने खरेदीसाठी ६३,७५७ रुपये मोजावे लागले. शिवाय दागिन्यांसाठी ग्राहकाला पुन्हा १२ ते १६ टक्क्यांपर्यंत कारागिरी शुल्क वेगळे द्यावे लागते. अशा प्रकारच्या दरवाढीमुळे सोने सामान्यांच्या आटोक्याबाहेर गेले आहे.
सोन्याचे तुलनात्मक भाव (रुपये) :
५ ऑक्टो. ५७,०००
१० ऑक्टो. ५८,०००
२० ऑक्टो. ६१,२००
२३ ऑक्टो. ६१,२००
२४ ऑक्टो. ६०,९००
२५ ऑक्टो. ६१,०००
२६ ऑक्टो. ६१,४००
२७ ऑक्टो. ६१,७००
२८ ऑक्टो. ६१,९००
(३ टक्के जीएसटी वेगळा.)