सोन्याला ७०० रुपयांची चकाकी, चांदीत १५०० रुपयांची वाढ
By मोरेश्वर मानापुरे | Published: August 30, 2023 08:09 PM2023-08-30T20:09:07+5:302023-08-30T20:09:48+5:30
आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत स्थानिक बाजारात सोन्याला दोन दिवसांत ७०० रुपयांची चकाकी आली तर चांदीचे भाव १५०० रुपयांनी वधारले.
नागपूर : आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत स्थानिक बाजारात सोन्याला दोन दिवसांत ७०० रुपयांची चकाकी आली तर चांदीचे भाव १५०० रुपयांनी वधारले. ऑगस्ट महिन्यात स्थिर असलेले सोन्याचे दर सणासुदीच्या काळात वाढू लागले आहेत. शनिवारी बाजार बंद होताना दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५९ हजार रुपये आणि चांदीचे प्रतिकिलो दर ७४,५०० रुपये होते. सोमवारी खुलत्या बाजारात सोन्याचे दर स्थिर तर चांदीने १०० रुपयांची उसळी घेतली. त्यानंतर सोन्याचे दर वाढू लागले. मंगळवारी सकाळच्या सत्रात सोने २०० रुपयांनी वाढले तर चांदीचे दर १०० रुपयांनी कमी झाले.
मात्र, अखेरच्या सत्रात सोने पुन्हा ३०० रुपयांनी वाढले अर्थात दिवसभरात ५०० रुपयांची वाढ होऊन ५९,५०० रुपयांवर स्थिरावले. तर चांदीत ७०० रुपयांची वाढ झाली. बुधवारी खुलत्या बाजारातही सोन्याचे भाव १०० रुपयांच्या वाढीसह उघडले. सायंकाळच्या सत्रात सोने पुन्हा १०० रुपयांनी वाढून ५९,७०० रुपयांवर स्थिरावले. याचप्रकारे मंगळवारच्या तुलनेत चांदीचे दर ८०० रुपयांनी वधारून ७६,१०० रुपयांवर पोहोचले. गेल्यावर्षीप्रमाणे यंदा सणासुदीत सोने आणि चांदीचे दर वाढतच राहील. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही मौल्यवान धातूंना मागणी वाढली आहे. नागरिकांना खरेदीची हीच संधी असल्याचे नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले.