सोन्याची विक्री तिप्पट! सर्वच सराफांकडे खरेदीसाठी गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2023 08:31 PM2023-05-20T20:31:15+5:302023-05-20T20:32:14+5:30

Nagpur News दोन हजाराची नोट वितरणातून मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शुक्रवारच्या निर्णयानंतर शनिवारी सोने खरेदीसाठी लोकांची पाऊले सराफांकडे वळली. ३ टक्के जीएसटी चुकता करीत लोकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याचे नाणे आणि दागिन्यांची खरेदी केली.

Gold sales tripled! There is a rush to buy at all the dealers | सोन्याची विक्री तिप्पट! सर्वच सराफांकडे खरेदीसाठी गर्दी 

सोन्याची विक्री तिप्पट! सर्वच सराफांकडे खरेदीसाठी गर्दी 

googlenewsNext

नागपूर : दोन हजाराची नोट वितरणातून मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शुक्रवारच्या निर्णयानंतर शनिवारी सोने खरेदीसाठी लोकांची पाऊले सराफांकडे वळली. ३ टक्के जीएसटी चुकता करीत लोकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याचे नाणे आणि दागिन्यांची खरेदी केली. शनिवारी सोन्याची विक्री तिप्पट झाली. 
सकाळपासून सराफांकडे लोकांची गर्दी होऊ लागली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ होऊन दरपातळी ६१,२०० रुपयांवर पोहोचली. दरवाढीनंतरही ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह होता. नागपुरात सराफांचे जवळपास २५ मोठे शोरूम आणि २ हजारांपेक्षा जास्त दुकाने आहेत. ग्राहकांची या सर्वांकडे गर्दी होती. 


आंतरराष्ट्रीय घडामोडींनुसार वाढतात सोन्याचे दर
आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडींनुसार भारतात सोन्याच्या दरात दररोज चढउतार होते. ६२,२०० रुपयांपर्यंत वाढलेले सोन्याचे दर १५ मे रोजी ६१,७०० रुपयांपर्यंत कमी झाले. त्यानंतर घसरण होऊन १६ मे रोजी ६१,५००, १७ मे रोजी ६१,०००, १८ व १९ मे रोजी ६०,८०० आणि २० मे रोजी सोन्याचे भाव ४०० रुपयांनी वाढून ६१,४०० रुपयांवर गेले. या दरावर ३ टक्के जीएसटी अतिरिक्त आकारण्यात येतो.


आधीच्या नोटाबंदीसारखी परिस्थिती नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण देशात लोकांमध्ये संतापाची लाट होती. ५०० आणि हजाराच्या नोट बदलवून घेण्यासाठी बँकांसमोर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. पण आता तशी परिस्थिती नाही. लोकांना नोटा बदलवून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. अन्य चलन सुरू असल्यामुळे लोकांच्या व्यवहारावर परिणाम होणार नाही. तीन ते चार वर्षांपासून एटीएममधून २ हजारांची नोट निघत नाही. त्यामुळे श्रीमंत वगळता सामान्यांकडे या नोटा नाहीच. अनिश्चितेमुळे सर्वोत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोने खरेदीकडे वळल्याचे अर्थतज्ज्ञांनी सांगितले.

५० हजारांपर्यंत केवायसी, २ लाखांपर्यंत पॅन कार्ड बंधनकारक
रिक्स नको म्हणून २ हजाराच्या नोटांनी ५० हजारांपर्यंत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकाकडून केवायसी आणि २ लाखांपर्यंत पॅनकार्डची झेरॉक्स बंधनकारक केली आहे. अशी माहिती असोसिएशनच्या सर्व सदस्यांना दिली आहे. २ हजाराच्या नोटेसंदर्भात सतर्कता बाळगण्यात येत आहे.
राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन.

Web Title: Gold sales tripled! There is a rush to buy at all the dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं