लॉकडाऊनमध्येही सोन्याची चमक वाढली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:45 PM2020-04-25T12:45:36+5:302020-04-25T12:46:04+5:30
कोरोना लॉकडाऊनने सराफा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यानंतरही सोन्याची चमक वाढली असून एक महिन्यात सोन्याचे दर दहा ग्रॅममागे ६३०० रुपयांनी तर चांदीचे दर ६६०० रुपयांनी वाढले आहेत.
आनंद शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना लॉकडाऊनने सराफा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यानंतरही सोन्याची चमक वाढली असून एक महिन्यात सोन्याचे दर दहा ग्रॅममागे ६३०० रुपयांनी तर चांदीचे दर ६६०० रुपयांनी वाढले आहेत.
आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलचे संचालक प्रदीप कोठारी आणि राजेश रोकडे म्हणाले, लॉकडाऊनने सराफा बाजार ठप्प झाला आहे, पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा कल सोने-चांदी खरेदी करण्याकडे वाढला आहे. विविध वित्तीय संस्था सोन्याला तेलानंतर गुंतवणुकीचा दुसरा महत्त्वपूर्ण पर्याय समजतात. याच कारणाने आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या किमती वाढण्याचा परिणाम स्थानिक सराफा बाजारात दिसून आला आहे.
लॉकडाऊनमुळे सराफा बाजार बंद असतानाही सोने आणि चांदीच्या दरात दररोज चढउतार पाहायला मिळत आहे. यातून अंदाज लावता येऊ शकतो की, लॉकडाऊनच्या काळात सोन्याचे दर ५० हजारांवर जातील. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,८०० रुपये प्लस जीएसटी आणि पक्की चांदीचे दर ४२ हजार रुपये प्लस जीएसटी आहेत. तर २० मार्च रोजी सोने ४१,५०० रुपये प्लस जीएसटी आणि चांदीे ३५,४०० रुपये दराने विकले होते.
लग्नसराई आणि ईदच्या सीझनमध्ये ग्राहकी ठप्प
प्रदीप कोठारी व राजेश रोकडे म्हणाले, लॉकडाऊनमुळे लग्नसराई आणि ईदमध्ये ग्राहकी ठप्प आहे. यामुळे सराफा व्यावसायिकांना कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नागपुरात लहानमोठे ३ हजारांपेक्षा जास्त व्यापारी आहेत. नागपुरात मध्य प्रदेश, छत्तीसगडचे ग्राहक खरेदीसाठी येतात. पण लॉकडाऊनमुळे ग्राहक येत नाहीत.
दागिने तयार करणारे कारागीर परतले स्वगृही
लॉकडाऊनमुळे दागिने तयार करणारे पश्चिम बंगालचे बहुतांश कारागीर स्वगृही परतले आहे. केवळ २५ टक्के कारागीर नागपुरात आहेत. सध्या तेसुद्धा दागिने तयार करीत नाहीत. त्यामुळे दागिन्यांची निर्मिती ठप्प झाली आहे.
अक्षय्य तृतीयेसाठी ऑनलाईन बुकिंग
सराफा दुकान बंद असल्याने अक्षय्य तृतीयेला प्रत्यक्ष व्यवसाय होणार नाही. त्यामुळे काही सराफा व्यापाऱ्यांनी ऑनलाईन दागिने बुकिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याअंतर्गत दुकानदाराच्या बँक खात्यात दागिन्याची रक्कम जमा करून ग्राहक लॉकडाऊननंतर दागिन्यांची डिलिव्हरी घेऊ शकतात.
शासनाने करात सूट द्यावी
लॉकडाऊनमुळे सराफा व्यवसायात कोट्यवधींचे नुकसान होत असून त्यातून बाहेर निघण्यासाठी व्यापाऱ्यांना करात सूट देण्याची विनंती सरकारकडे केली आहे. कर्जावरील व्याज माफ करावे, दुकानातील कर्मचाºयांच्या वेतनात शासनाने योगदान द्यावे, दुकानांच्या किरायाच्या रकमेत सूट तसेच जीएसटीमध्ये सूट देण्याची मागणी आहे.