सोन्याची तस्करी पकडली

By admin | Published: July 1, 2015 02:58 AM2015-07-01T02:58:46+5:302015-07-01T02:58:46+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारच्या पहाटे तस्करी करून आणलेले ३ किलो सोने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले.

Gold smuggled | सोन्याची तस्करी पकडली

सोन्याची तस्करी पकडली

Next

एअर अरेबिया विमानातून आला होता तस्कर : गीतांजलीत चोरटा पकडला
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारच्या पहाटे तस्करी करून आणलेले ३ किलो सोने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. अन्य एका कारवाईत रेल्वे सुरक्षा जवानांनी गीतांजली एक्स्प्रेसमधून १२ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या एका चोरट्याला अटक केली.
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास आपल्या नियोजित वेळेवर जी ९ - ४१५ हे एअर अरेबियाचे विमान विमानतळावर उतरले. प्रवासी विमानातून उतरल्यानंतर कस्टम तपासणीदरम्यान एका २८ वर्षीय युवकाला अडवण्यात आले. त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली असता कॉईलच्या स्वरूपात सोने आढळून आले. हे कॉईल त्याने म्युझिक सिस्टिममध्ये दडवलेले होते. या सोन्याचे वजन ३ किलो २ ग्रॅम ५०० मिलिग्रॅम आहे. किंमत ७४ लाख ६१ हजार रुपये आहे. या तरुणाला कस्टम कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.
१२ लाखांच्या दागिन्यांच्या चोरीची घटना नागपूर-रायपूरदरम्यान गीतांजली एक्स्प्रेसमध्ये सोमवारच्या रात्री घडली. चोरी केल्यानंतर लागलीच पोलिसांनी चोराला अटक करून त्याच्याजवळून सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल जप्त केले. गीतांजली एक्स्प्रेस कोलकात्याकडे रवाना होताना या रेल्वेगाडीचा बी.एल. मडावी, डब्ल्यू. लकरा, समीर उमाठे, एम.के. उईके यांचा समावेश असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ताबा घेतला. त्यांना एस-१४ क्रमांकाच्या डब्यात एक तरुण संशयास्पदस्थितीत आढळून आला. चौकशीत त्याच्याजवळ दुसऱ्याच रेल्वेगाडीचे तिकीट आढळले.
त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्याच्याजवळ ५०, १०० आणि ५०० च्या नोटांचे बंडल्स आढळून आले. सोने आणि चांदीचे दागिने आढळले. त्याच्याजवळ गर्द आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्याही आढळल्या. नूरनबी गुलाम कादर शेख (२५), असे या चोरट्याचे नाव असून तो पश्चिम बंगालचा रहिवासी आहे.
प्रारंभी या चोरट्याने आरपीएफ जवानांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दागिने आपल्या पत्नीचे असल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर या जवानांनी याच डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवाशांना हे दागिने दाखवून ते त्यांचे आहेत काय, अशी विचारणा केली. परंतु कोणीही या दागिन्यांवर आपला दावा केला नव्हता. पथकाने या चोरट्याला आपला हिसका दाखवताच त्याने मुंबई भागात लुटालूट केल्याचे सांगितले. लुटीचा माल घेऊन पळत असतानाच तो या जवानांच्या तावडीत अडकला. त्याला राजनांदगाव रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: Gold smuggled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.