विदर्भाच्या काळ्या मातीत ‘ब्लॅक राईस’ आणणार सोनेरी दिवस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:50 AM2018-10-26T11:50:26+5:302018-10-26T11:51:04+5:30

यशकथा : नागपूर जिल्ह्यातील ७० एकर क्षेत्रावर ‘ब्लॅक राईस’चा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

The golden day will bring 'black rice' to the black soil of Vidarbha | विदर्भाच्या काळ्या मातीत ‘ब्लॅक राईस’ आणणार सोनेरी दिवस 

विदर्भाच्या काळ्या मातीत ‘ब्लॅक राईस’ आणणार सोनेरी दिवस 

Next

- जितेंद्र ढवळे (नागपूर )

कपाशीवर बोंडअळीने केलेला हल्ला, सोयाबीनला मिळणारा अपुरा भाव यामुळे हताश झालेल्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ‘ब्लॅक राईस’ (काळा तांदूळ) सोनेरी दिवस निश्चितच आणणार आहे. पूर्व विदर्भातील पारंपरिक पद्धतीने भातशेती कमी उत्पादनामुळे किफायतशीर ठरत नसल्यामुळे कमी दिवसांत जास्त उत्पादन देणाऱ्या भात पिकांच्या रोवणीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच औषधी गुणधर्म असलेल्या ‘ब्लॅक राईस’ (काळा तांदूळ) उत्पादनाला प्रोत्साहन दिल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील ७० एकर क्षेत्रावर ‘ब्लॅक राईस’चा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

फार वर्षांपूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ‘ब्लॅक राईस’ची लागवड केली जात होती. त्यामुळे या तांदळाचे ‘फोरबिडन राईस’ असे नाव ठेवण्यात आले. या तांदळात वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असल्यामुळे युरोप व अमेरिकेपर्यंत प्रसार झाला. कालांंतराने यावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले. सर्वसाधारण पारंपरिक भात पिकापासून १२ ते १५ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन होते. त्यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांना कृषी विभागाच्या आत्मांतर्गत ‘ब्लॅक राईस’ लागवडीचा प्रयोग नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा, उमरेड, कुही, पारशिवनी व कामठी या तालुक्यातील निवडक शेतकरी गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा ७० एकरामध्ये राबविण्यात आला आहे.

‘ब्लॅक राईस’चे बियाणे छत्तीसगड येथून मागविण्यात आले असून सेंद्रिय पद्धतीने भात उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. ‘ब्लॅक राईस’चे उत्पादन ११० दिवसांत घेतल्या जात असल्याने दुसऱ्या पिकांसाठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पीक घेणेसुद्धा सहज शक्य झाले आहे. शेतातील धानाच्या लोंबी बघता पारंपरिक धानापेक्षा निश्चितच जास्त उत्पादन होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. भारतामध्ये ‘ब्लॅक राईस’ उत्तर-पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. स्वास्थ्यवर्धक अनेक गुणधर्म असल्यामुळे याला चांगली मागणी आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी १० बचत गटांच्या माध्यमातून पहिल्यांदाच उत्पादनाला सुरुवात करण्यात आल्याचे कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी स्पष्ट केले आहे. 

‘ब्लॅक राईस’मध्ये फायबर, मिनरल्स (आर्यन व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटिन आहे. कॅन्सरसह मधुमेह, लठ्ठपणा कमी करणे, हृदयविकारासापासून बचाव आणि शरीरातील विषारी द्रव्य कमी करण्यासाठी हा तांदूळ गुणकारी असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. ‘ब्लॅक राईस’ खाणे आरोग्यवर्धक असल्यामुळे वॉलमार्टसह इतर सुपर बाजारमध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या काळ्या तांदळाला प्रतिकिलो ४०० रुपये भाव मिळत आहे.

Web Title: The golden day will bring 'black rice' to the black soil of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.