सुनहरी यादे : बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:00 PM2019-12-28T23:00:06+5:302019-12-28T23:03:32+5:30
जुनी गाणी लक्षात राहतात ती केवळ शब्दसाजावर चढविलेल्या स्वरमाधुर्याने. शब्दात दडलेला तरल अर्थ हृदयातून ओसंडून वाहायला लागला, तेव्हा ती गाणी जन्माला आली. तो गोडवा रसिकांच्या मनात कायम साठवला गेला. म्हणूनच ‘बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात’ अशी उत्स्फूर्त भावना दाटून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुनी गाणी लक्षात राहतात ती केवळ शब्दसाजावर चढविलेल्या स्वरमाधुर्याने. शब्दात दडलेला तरल अर्थ हृदयातून ओसंडून वाहायला लागला, तेव्हा ती गाणी जन्माला आली. तो गोडवा रसिकांच्या मनात कायम साठवला गेला. म्हणूनच ‘बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात’ अशी उत्स्फूर्त भावना दाटून येते.
सप्तकच्या वतीने पर्सिस्टंट सिस्टीमच्या कवि कुलगुरू कालिदास सभागृहात शनिवारी डॉ. विनय वाईकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हिंदी-मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम ‘सुनहरी यादे’ सादर झाला. नव्या दमाचे प्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे व विभावरी आपटे-जोशी यांनी ही गाणी सादर केली. एरवी चित्रपट गीतांचे कार्यक्रम दररोज होत असतात आणि रसिकही उत्स्फूर्त दाद देतात. मात्र, अशा मैफिलीत शब्दस्वरांची कैफियत रसिकांच्या हृदयाला भिडावी, असे क्षण क्वचितच दिसतात. गायकांची तयारी आणि रियाजातून निर्माण होणारा आर्जव अभावानेच दिसून येतो. चित्रपट गीतातील सुगम संगीतातील तो आर्जव, ते माधुर्य शनिवारी या कार्यक्रमात दिसून आले. गायकांच्या तयारीने रसिकांची मने जिंकली. एखादे गाणे आवडले म्हणजे सहजच रसिक ‘वन्स मोअर’ अशी दाद देत असतो. मात्र, एखाद्या गाण्यातील ते एखादे कडवे पुन्हा ऐकावे, अशी प्रगल्भ दाद जाणतेच देतात. अशी दाद देण्याचा सरावही अस्सल व कसलेल्या रसिक बैठकीतूनच होत असतो. अशा जाणिवेचा ‘वन्स मोअर’ शनिवारी गायकांना प्राप्त होत होता. एवढेच नव्हे तर तबल्यावर बरसणाऱ्या अंगुलीच्या तडाख्यातून व थापेतून निर्माण होणारे बोल रसिकांना ‘वन्स मोअर’चा आग्रह धरत होते, हेही जाणत्या रसिकतेचेच यश.
यावेळी तुम आशा विश्वास हमारे, मैंने तेरे लिये ही, न जाने क्यों, जीवनसे भरी तेरी आंखें,याद किया दिलने, लग जा गले, भंवरेकी गुंजन, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, लाजून हासणे, धुंदी कळ्यांना, कल्पवृक्ष कन्येसाठी, बगळ्यांची माळ फुले, माझे मन तुझे झाले, जे वेड मजला लागले, मी डोलकर, मैं दिल हुँ एक अरमान भरा, अगर तो है तुमसे, आपके हसीन रूख पे, छुपालो युँ दिल में प्यार मेरा, रहें ना रहें हम, फुलो के रंग से, हमारे बाद अब महफिल में, एक प्यार का नगमा है... अशी गाणी सादर झाली. गायकांना कीबोर्डवर केदार परांजपे, दर्शना जोग, तबल्यावर विक्रम भट, ढोलकी व साईड रिदमवर विलास अंडुलकर यांनी साथसंगत केली. तत्पूर्वी गायक व वादकांचे स्वागत डॉ. वीणा वाईकर, अपर्णा वाईकर, डॉ. मनिषा पटवर्धन, डॉ. पल्लवी सिन्हा, समीर बेंद्रे यांनी केले. प्रास्ताविक अमित वाईकर यांनी केले तर संचालन डॉ. उदय गुप्ते यांनी केले. त्यानंतर प्रसिद्ध निवेदक डॉ. सुधीर भावे व रेणुका देशकर यांच्या संवादातून प्रत्येक गीताचा इतिहास रसिकांसमोर येत होता.