सुगंधित तंबाखूच्या कारवाईत गोलमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:07+5:302021-07-16T04:07:07+5:30
नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - लाखोंचा सुगंधित तंबाखू भरलेले वाहन हाती लागल्यानंतर कारवाई करण्याऐवजी पोलीस पथक ...
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - लाखोंचा सुगंधित तंबाखू भरलेले वाहन हाती लागल्यानंतर कारवाई करण्याऐवजी पोलीस पथक रिकाम्या हाताने परतले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी ही घडामोड झाली. यामुळे कारवाईत गोलमाल करून लाखोंची डील झाल्याची जोरदार चर्चा लकडगंजमध्ये पसरली आहे.
लकडगंजमध्ये स्मॉल फॅक्टरी एरिया आहे. येथे रोज कोट्यवधींच्या किमतीच्या वेगवेगळ्या चिजवस्तू , साहित्य आणि पदार्थ येत असतात. त्यात प्रतिबंधित साहित्य आणि तत्सम पदार्थांचाही समावेश आहे. या भागात नियमित कोट्यवधींची सडकी सुपारी आणि प्रतिबंधित तंबाखू, गुटखाही येतो. बहुतांश पोलिसांना त्याची माहिती आहे. विशिष्ट जणांचा वरदहस्त असल्याने प्रतिबंधित सुपारी, गुटखा आणि सुगंधित तंबाखू तसेच तत्सम पदार्थाचा कोट्यवधींची हेरफेर करणारा गोरखधंदा बिनबोभाट सुरू आहे. रेशनच्या धान्याचाही काळाबाजार जोरात सुरू आहे. महिना-पंधरा दिवसातून एखादवेळी पोलिसांना पक्की टीप मिळाली आणि कारवाईसाठी पोलीस धडकले तरी मध्येच कुणाचा तरी निरोप येतो आणि नंतर कारवाईचा गोलमाल होतो. बुधवारी दुपारी असेच झाल्याची चर्चा आहे. लाखोंचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, गुटखा आणि तत्सम पदार्थ असलेले वाहन येणार असल्याची पोलिसांना टीप मिळाली. त्यामुळे लकडगंज पोलीस स्मॉल फॅक्टरी एरियात पाळत ठेवून होते. वाहन नजरेस पडताच पोलिसांच्या पथकाने धाव घेतली. चाैकशी सुरू झाली आणि कुणाचा तरी निरोप आला. त्यानंतर कारवाई न करताच पोलिसांचे पथक हात हलवत परतले. तेव्हापासून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. लाखोंची डील झाल्याचीही चर्चा आहे.
----
तिवारीने घुमविले चक्र
लकडगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात अवैध धंदे आणि सुपारी, तंबाखूसारखा गोरखधंदा करणाऱ्यांच्यावतीने तिवारी मांडवलीचे काम करतो. तोच पोलिसांच्या कारवाईपासून त्यांना वाचवतो. संशयास्पद ठरलेल्या बुधवारच्या या कारवाईवजा घडामोडीत त्याने आणि दुसऱ्या एकाने महत्वाची भूमिका वठविल्याचे समजते. वरिष्ठांनी कसून चाैकशी केल्यास लाखोंच्या मांडवलीचे पितळ उघडे पडू शकते, अशीही संबंधित वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
----
काहीच मिळाले नाही - ठाणेदार पोटे
या संबंधाने लकडगंजचे ठाणेदार पराग पोटे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ‘सुगंधित तंबाखू-सुपारीच्या वाहनाची माहिती मिळाली होती. त्यामुळे आमचे पोलीस पथक कारवाईसाठी गेले होते. मात्र, वाहनात काहीच आढळले नाही’, अशी माहिती पोटे यांनी दिली.
----