गोंदिया @ १०.९; पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 07:43 PM2021-11-30T19:43:29+5:302021-11-30T19:44:07+5:30
Nagpur News हवामान केंद्राने येत्या दोन दिवसात पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून जाणवायला लागलेली थंडी पुन्हा वाढून पारा खालावण्याची शक्यता आहे.
नागपूर : हवामान केंद्राने येत्या दोन दिवसात पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून जाणवायला लागलेली थंडी पुन्हा वाढून पारा खालावण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व अरबी समुद्रामध्ये तसेच मालदीव, लक्षद्वीप परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर, पूर्व आणि मध्य अरबी समुद्रामध्ये द्रोण स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढील २४ तासांमध्ये मालदीव, लक्षद्वीप परिसरासह पूर्व आणि मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर पडणार असून विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यात येत्या दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या वातावरणामुळे विदर्भात थंडीचा जोर अधिकच वाढलेला असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान, उपराजधानी नागपूरचा पारा मागील २४ तासात ०.८ ने पारा घसरला असून मंगळवारी १२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. शहरातील आर्द्रता सकाळी आणि सायंकाळी ५२ टक्के नोंदविली गेली. दिवसभरात ही शहरात हुडहुडी जाणवत होती.
विदर्भात मंगळवारी गोंदियाचे किमान तापमान सर्वात कमी १०.९ नोंदविले गेले. त्या पाठोपाठ नागपुरात १२.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम, गडचिरोलीमध्ये १५, बुलडाणा १६.५, चंद्रपूर १७.६ तर अकोलामध्ये १८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.