गोंदिया हत्याकांडात मृत कुुटुंबातील तरुणीवर सर्वाधिक वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:10 AM2021-09-24T04:10:25+5:302021-09-24T04:10:25+5:30
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गोंदिया जिल्हा हादरवून सोडणाऱ्या एकाच कुटुंबातील चाैघांच्या मृत्यू प्रकरणात बिसेन कुटुंबातील पोर्णिमानामक ...
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोंदिया जिल्हा हादरवून सोडणाऱ्या एकाच कुटुंबातील चाैघांच्या मृत्यू प्रकरणात बिसेन कुटुंबातील पोर्णिमानामक तरुणी निर्दयतेचा बळी ठरली आहे. मारेकऱ्यांनी तिच्यावर लोखंडी रॉडने अनेक फटके मारून तिचा चेहरा पुरता बिघडवला आहे. त्यावरून मारेकऱ्याचे टार्गेट पोर्णिमा होती, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचे अनेक पैलू दोन दिवसांत पुढे आले असले तरी पोलीस या संबंधाने उघडपणे काही जाहीर करण्याचे टाळत आहेत.
अमानुषतेचा कळस गाठणारी चुरडी- तिरोडा (जि. गोंदिया) येथील ही घटना मंगळवारी (दि. २१) उघडकीस आली. शीर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिसेन कुटुंबाचा प्रमुख रेवचंदचा गळफास लावलेला आणि त्याची पत्नी मालता, मुलगी पोर्णिमा तसेच तेजस हे तिघे रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. पुढे रेवचंदवगळता तिघांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार करून त्यांची हत्या केल्याचे आणि रेवचंदचा गळफासामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालातून स्पष्ट केले आहे. वैद्यकीय अहवालानुसार, आरोपीने सर्वाधिक लोखंडी रॉडचे फटके बिसेन कुटुंबातील पोर्णिमा हिच्यावर हाणले आहेत. तिचा संपूर्ण चेहराच आरोपीने बिघडवला आहे. त्यातून पोर्णिमावर आरोपीचा सर्वाधिक राग होता, असा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी काढला आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी या चाैघांचे मृतदेह आढळले त्या खोलीचे दार आतून बंद होते.
घरात शिरण्याचा वरचा मार्ग म्हणजे जिना. या जिन्यावरील कुंड्याही दाटीवाटीने ‘जैसे थे’च ठेवून होत्या. त्याचप्रमाणे श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आणि एकूणच परिस्थितीजन्य पुरावे या घटनेचा आरोपी म्हणून मृतकाशी संबंधित व्यक्तीकडेच अंगुलीनिर्देश करीत आहेत. मात्र, आरोपीबाबतचा अहवाल जाहीर करण्याऐवजी पोलिसांनी चारही मृतदेहांचे व्हिसेरा प्रिझर्व्ह करून नागपूरच्या रासायनिक प्रयोगशाळेत पाठविले आहेत. तो अहवाल आल्यानंतरच आम्ही या प्रकरणाबाबत काही ठोसपणे सांगू, असे गोंदियाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे.
---
तिघे जेवले; रेवचंद उपाशीच
वैद्यकीय अहवालानुसार, तेजस, पोर्णिमा आणि त्यांची आई मालता हे तिघेही घटनेच्या पूर्वी जेवले. रेवचंदच्या पोटात केवळ पाणी आढळले. अर्थात त्याने त्या रात्री जेवणही घेतले नव्हते, हे स्पष्ट झाले आहे. जेव्हा की शिजविलेले भरपूर अन्न फ्रीजमध्ये ठेवून होते.
---
वरिष्ठांनी मागून घेतला चाैकशी अहवाल
गोंदिया जिल्ह्याच्या या घटनेची चर्चा सर्वत्र पसरली आहे. या हत्याकांडाचा आरोपी कोण ते जाणून घेण्यासाठी नागपूर-मुंबईतील वरिष्ठांकडूनही गोंदिया पोलिसांना विचारणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर, गोंदिया-गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनीही गोंदिया पोलीस प्रशासनाकडून आतापर्यंतचा चाैकशी अहवाल मागून घेतला आहे.
---