सूर्याचा प्रकाेप थांबता थांबेना; गाेंदिया ४६.२ तर नागपूरमध्ये ४५.२ अंश तापमानाची नाेंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 12:41 PM2022-06-06T12:41:55+5:302022-06-06T12:46:21+5:30
मे महिन्याच्या शेवटी मान्सूनपूर्व माेसमी वाऱ्यांनी जरासा गारवा निर्माण केला असताना उन्हाचा त्रास कमी हाेईल ही अपेक्षा जूनच्या सुरुवातीला भंगली. विदर्भकरांना यावर्षी मार्चपासूनच उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे.
नागपूर : अनेक दिवसांपासून तीव्र उन्हाच्या झळा सहन करीत पावसाची प्रतीक्षा करीत असलेल्या नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. जूनचा पहिला आठवडा संपत चालला तरी सूर्याचा प्रकाेप कमी व्हायला तयार नाही. रविवारीही उन्हाच्या झळांनी चांगलेच हाेरपळले. नागपूरमध्ये ४५.२ अंश तापमानाची नाेंद झाली, तर ४६.२ अंशासह गाेंदियामध्ये जून महिन्यात शतकातील सर्वाधिक तापमान ठरले.
मे महिन्याच्या शेवटी मान्सूनपूर्व माेसमी वाऱ्यांनी जरासा गारवा निर्माण केला असताना उन्हाचा त्रास कमी हाेईल ही अपेक्षा जूनच्या सुरुवातीला भंगली. विदर्भकरांना यावर्षी मार्चपासूनच उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. एप्रिल, मे मध्ये विदर्भातील पाच शहरे उष्णतेच्या जागतिक क्रमवारीत पाेहोचले. नुकताच केरळमध्ये मान्सून दाखल झाला व ताे लवकर महाराष्ट्र व विदर्भात येईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, गुजरात, राजस्थानकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी माेसमी वाऱ्याची वाट राेखली आणि पुन्हा उन्हाच्या झळा लागल्या.
तापमानाची तीव्रता चाैथ्या दिवशीही कायम हाेती. ४४.८ अंशासह अकाेला आणि ४४.२ अंशासह अमरावतीचा पारा पुन्हा चढला. ४२.९ अंशासह चंद्रपूरचा पारा उतरला, पण ब्रह्मपुरी ४६.२ अंशापर्यंत तापले. नागपूरसाेबत वर्धावासीयांनीही ४५ अंशाचे चटके साेसले. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात सरासरी ३, ४, ५ अंशापर्यंत तापमानाने उसळी घेतली.
५ जूनला महाराष्ट्रातील सर्वोच्च तापमान
२००३ ब्रह्मपुरी-४७.३
२००३ वर्धा ४७.१
२००३ नागपूर- ४६.७
१९९६ पुसद - ४७.६
१९९५ यवतमाळ ४६.६
२०२२ गाेंदिया ४६.२