गोंडखैरी प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:27 AM2020-12-04T04:27:03+5:302020-12-04T04:27:03+5:30
विजय नागपुरे कळमेश्वर : नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या गोंडखैरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसराच्या साफसफाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात ...
विजय नागपुरे
कळमेश्वर : नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या गोंडखैरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसराच्या साफसफाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. आरोग्य केंद्राला झाडाझुडपांनी वेढा घातलेला आहे. परिसराची साफसफाई करून केंद्रात नवचैतन्य निर्माण करण्याची गरज आहे. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कळमेश्वरच्या अधिपत्याखाली गोंडखैरी या ६०३५ लोकसंख्येच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले. हे केंद्र अगोदर एका जीर्ण इमारतीमध्ये होते. यानंतर लाखो रुपये खर्च करून आधुनिक सोयीसह आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली. परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुद्धा झाली. हे आरोग्य केंद्र नागपूर-अमरावती महामार्गालगत असून येथे रुग्णांची नेहमीच वर्दळ असते. परंतु आरोग्य केंद्राचा परिसर बघताच येथे येणाऱ्यात नैराश्य निर्माण होते. सर्वत्र केरकचरा साचला असून परिसरात झाडेझुडपे वाढलेली आहेत. परिसर समतल करण्याची गरज असून याकडे मात्र आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील झाडाझुडपात सदैव विषारी प्राण्यांचा मुक्त संचार राहतो. त्यांचा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तथा रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात मुदत संपलेल्या औषधांची विल्हेवाट लावण्याची एक विशिष्ट पद्धत असते. परंतु येथे मात्र त्या पद्धतीला फाटा देत झाडाझुडपांच्या आडोशाने औषधे जाळल्या जात असल्याचे चित्र आहे. सोबतच रुग्णांनी तथा नागरिकांनी वापरलेले मास्क मोठ्या प्रमाणात पडून आहेत. अशा मास्कपासून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून परिसराचा कायापालट करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.