गोंडवाना विद्यापीठात ‘आदिवासी अध्यासन’ हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 08:49 PM2018-03-09T20:49:22+5:302018-03-09T20:49:36+5:30
गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना होऊन आता आठ वर्षे झाली आहेत. या विद्यापीठांतर्गत २३७ महाविद्यालये येतात. या भागात गोंडी, माडिया, हलबी, कोलामी यासारख्या बोलीभाषा बोलल्या जातात. परंतु विद्यापीठात मात्र या भाषांशी संबंधित कोणताही अभ्यासक्रम नाही. त्यामुळे या भाषांच्या संवर्धनासाठी ‘आदिवासी अध्यासन’ निर्माण करावे, अशी मागणी प्रभू राजगडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना होऊन आता आठ वर्षे झाली आहेत. या विद्यापीठांतर्गत २३७ महाविद्यालये येतात. या भागात गोंडी, माडिया, हलबी, कोलामी यासारख्या बोलीभाषा बोलल्या जातात. परंतु विद्यापीठात मात्र या भाषांशी संबंधित कोणताही अभ्यासक्रम नाही. त्यामुळे या भाषांच्या संवर्धनासाठी ‘आदिवासी अध्यासन’ निर्माण करावे, अशी मागणी प्रभू राजगडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात आदिवासी साहित्य हा विषय अभ्यासक्रमात आहे. अनेक संशोेधक प्राध्यापक आदिवासी साहित्य व यासंबंधित विषयांवर पी.एचडी. करीत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. असे आदिवासी अध्यासन निर्माण करणे का गरजेचे आहे, याची कारणेही त्यांनी या पत्रात नमूद केली आहेत. आदिवासी अध्यासन झाल्याने महाराष्ट्रातील आदिवासी बोलीभाषा व अन्य बोलीभाषा यांचा तौलानिक अभ्यास करणे सोपे होईल. आदिवासी संस्कृती आणि मानवी व्यवहार, आधुनिकता यावरील अभ्यासाला चालना मिळेल. आदिवासींमधील स्थापत्यकला, आयुर्वेद, आभूषणकला, काष्ठशिल्पशास्त्र, धातूकला यांचा उगम, विकास व आजच्या स्थितीतील त्यांची स्थिती याचेही नीट आकलन होऊ शकेल. याशिवाय आदिवासींच्या जल-जंगल-जमीनविषयक भूमिका, त्या संबंधाने झालेले कायदे याबाबत अभ्यास करता येईल. त्यामुळे शासनाने या मागणीचा अविलंब व गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी राजगडकर यांनी या पत्रात केली आहे.