गोंडवाना विद्यापीठ संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख उभारणार

By निशांत वानखेडे | Published: November 25, 2023 05:11 PM2023-11-25T17:11:50+5:302023-11-25T17:21:27+5:30

अधीसभेत ठराव पारित : वर्षभर विविध उपक्रमांसह साजरा होणार संविधान महोत्सव

Gondwana University will erect an inscription of the Preamble of the Constitution | गोंडवाना विद्यापीठ संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख उभारणार

गोंडवाना विद्यापीठ संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख उभारणार

नागपूर : भारतीय संविधान लागू हाेण्याला ७४ वर्ष पूर्ण होऊन यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. गाेंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील नविन कॅम्पसमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख दर्शनी भागावर उभारण्यात येणार आहे. भारतीय संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा निर्णय अधिसभेत घेण्यात आला.

गोंडवाना विद्यापिठाची अधिसभा कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या अधीसभेत डॉ. मिलींद भगत यांनी संविधान सन्मान महोत्सव साजरा करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला व दीपक धोपटे यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला. भारतीय राज्यघटनेची उद्देशिका हे संविधानाची मूलभूत तत्वे आणि उद्दिष्ट सांगणारे प्रास्ताविक विधान आहे.

भारत जगात सर्वात मोठा लोकशाहीचा देश म्हणून ओळखला जातो आणि संविधानाने लोकशाही बळकट करण्याचे काम केले आहे. भारतीय संविधानाने समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता ही मूल्ये भारतीयांमध्ये रुजवली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक नितीमत्ता निर्माण करणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट असल्याचे विद्यापीठ कायद्यात नमूद आहे, म्हणून अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश करीत असताना विद्यापीठाच्या नव्याने निर्माण होणाऱ्या शैक्षणिक परिसराच्या दर्शनी भागात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख उभारण्याचा ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आला.

विद्यापीठाने संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करून त्याद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे तसेच विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करण्याच्या सूचना द्याव्या व संविधान सन्मान महोत्सव साजरा केल्याचे महाविद्यालयाकडून अहवाल प्राप्त करून घ्यावा, अशा सुचना देण्यात आल्यात.

विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रामार्फत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्ताने संविधान सन्मान महोत्सवाचे वर्षभरात आयोजन करण्यात येईल असे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगितले. यासाठी ५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सदर महोत्सव संलग्नीत महाविद्यालयांमध्ये सुध्दा साजरा करुन त्याबाबतचा अहवाल मागविण्यात येईल, तसेच महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीतानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात यईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व पदवी अभ्यासक्रमात संविधान विषय

गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता भारतीय संविधान विषय म्हणून सुरू करण्यास राज्यशास्त्र अभ्यासमंडळ व मानवविज्ञान विद्याशाखेने मंजूरी प्रदान केली असून पुढच्या सत्रा पासून याची अंमलबजावणी करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. याकरिता विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी विशेष प्रयत्न केले आहे.

Web Title: Gondwana University will erect an inscription of the Preamble of the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.