चांगला डॉक्टर, सर्जन होण्यासाठी ‘स्किल’ आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:02 AM2018-09-05T01:02:30+5:302018-09-05T01:04:15+5:30
वैद्यकीय शिक्षण हे इतरांपेक्षा वेगळे आहे. रोज या क्षेत्रात नवे संशोधन होत आहे. यामुळे चांगला डॉक्टर, शल्यचिकित्सक (सर्जन) होण्यासाठी आवश्यक ज्ञानासोबतच त्यातील कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. ‘एम्स’मध्ये प्रवेश घेतल्यामुळे भविष्यात तुम्ही चांगले डॉक्टर जरूर बनाल; पण वैद्यकीय सेवाभाव विसरू नका, असे भावनिक आवाहन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीय शिक्षण हे इतरांपेक्षा वेगळे आहे. रोज या क्षेत्रात नवे संशोधन होत आहे. यामुळे चांगला डॉक्टर, शल्यचिकित्सक (सर्जन) होण्यासाठी आवश्यक ज्ञानासोबतच त्यातील कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. ‘एम्स’मध्ये प्रवेश घेतल्यामुळे भविष्यात तुम्ही चांगले डॉक्टर जरूर बनाल; पण वैद्यकीय सेवाभाव विसरू नका, असे भावनिक आवाहन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.
बहुप्रतीक्षित असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) एमबीबीएस अभ्यासक्रमाला ६ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मंगळवारी एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी ‘ओरिएन्टेशन अॅण्ड इंडक्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर ‘एम्स’चे उपसंचालक लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार बक्षी उपस्थित होते.
डॉ. निसवाडे म्हणाले, साधारण २३० एकर परिसरात आज जी मेडिकलची वास्तू आहे तिचे उद्घाटन १९५२ साली पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते झाले होते. मात्र मेडिकल कॉलेज त्यापूर्वीच सुरू झाले होते. येथील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग अंजुमन कॉम्प्लेक्समध्ये भरत होते. आज या संस्थेत इतर संस्थेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत, ही गौरवाची बाब आहे. या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य लेफ्टनंट कर्नल ए. एन. बोस होते. आज ‘एम्स’च्या उभारणीत ज्यांची महत्त्वाची भूमिका ठरत आहे तेही एक ‘कर्नल’च आहेत. यामुळे या संस्थेचाही भविष्यात मोठा नावलौकिक होईल, ही अपेक्षा आहे. आज वैद्यकीय ज्ञान इंटरनेट, संगणक व मोबाईलच्यामाध्यमातून उपलब्ध आहे. परंतु यातून ‘स्किल’ म्हणजे कौशल्य शिकता येत नाही. ते आत्मसात करावे लागते, असे मत मांडत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बक्षी यांनी मिहानमध्ये २५२ एकरमध्ये उभारण्यात येत असलल्या ‘एम्स’च्या बांधकामाची माहिती दिली. पुढील वर्षात रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. डॉ. मृणाल पाठक यांनी विद्यार्थ्यांना मेडिकल महाविद्यालयात सुरू होणाऱ्या ‘एम्स’च्या महाविद्यालयाबद्दलची माहिती देऊन योग्य वर्तणुकीची शपथ दिली. डॉ. प्रदीप देशमुख यांनी अभ्यासक्रमाच्या विषयांची,डॉ. सीमा गर्ग यांनी ‘लिंग छळवणूक समिती’ची, डॉ. आदित्य तारणेकर यांनी ‘रॅगिंग प्रतिबंधक’ कायद्याची माहिती दिली. संचालन डॉ. विणू वेज यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक व मेडिकलचे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक उपस्थित होते.