‘समृद्धी’वर मिळतात भजी अन् बिस्किटे!; रस्ते विकास महामंडळाला कानपिचक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 10:42 AM2024-09-26T10:42:11+5:302024-09-26T10:42:33+5:30
वाहनचालकांनी घरातूनच खाद्यपदार्थ घेऊन प्रवास करावा, अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही.
नागपूर :समृद्धी महामार्गावर अद्याप चांगली उपाहारगृहे उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना पेट्रोलपंप परिसरात मिळतील ते पदार्थ खावे लागतात. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठानेही समृद्धी महामार्गावर केवळ भजी अन् बिस्किटेच मिळतात, असे निरीक्षण नोंदवत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला कानपिचक्या दिल्या.
समृद्धीवर आवश्यक ठिकाणी चांगली उपाहारगृहे, प्रसाधनगृहे, वाहन दुरुस्ती केंद्रे इत्यादी सुविधा उपलब्ध व्हाव्या, याकरिता सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्तिद्वय भारती डांगरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
वाहनचालकांनी घरातूनच खाद्यपदार्थ घेऊन प्रवास करावा, अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. त्यामुळे चांगली उपाहारगृहे सुरू करणे आवश्यक आहे. याशिवाय, या महामार्गावरील प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता होत नसल्याने घाण व दुर्गंधी पसरली असते, असेदेखील न्यायालयाने नमूद करून रस्ते महामंडळावर नाराजी व्यक्त केली.
१६ पेट्रोलपंप सुरू
राज्य रस्ते विकास महामंडळाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून समृद्धी महामार्गावर २४ पैकी १६ पेट्रोलपंप सुरू झाले आहेत.
येथे इंधनासह नायट्रोजन गॅस, पंक्चर दुरुस्ती दुकाने व पॅक खाद्यपदार्थ मिळतात.
सर्व पथकर नाक्यांवरही प्रसाधनगृहे आहेत ते नियमित स्वच्छ करण्याचे निर्देशही संबंधितांना दिले, अशी माहिती महामंडळाने दिली.