नशीब बलवत्तर म्हणून ती बचावली
By admin | Published: October 31, 2015 03:21 AM2015-10-31T03:21:33+5:302015-10-31T03:21:33+5:30
राज्य राखीव दलाच्या जवानांकडून केल्या जाणाऱ्या ‘ सरावा’ दरम्यान सुटलेली एक गोळी इसासनीतील एका बालिकेच्या हाताला चाटून गेली.
नागपूर : राज्य राखीव दलाच्या जवानांकडून केल्या जाणाऱ्या ‘ सरावा’ दरम्यान सुटलेली एक गोळी इसासनीतील एका बालिकेच्या हाताला चाटून गेली. नशीब बलवत्तर म्हणून या बालिकेला किरकोळ इजा वजा कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. मात्र या घटनेमुळे शुक्रवारी दिवसभर एमआयडीसी परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
घटना सकाळी ९.२० ची आहे. वाघधरा इसासनी येथील शालू रामनाथ रॉय (वय १५) ही मुलगी आपल्या घराच्या बाहेर कामकाज करीत होती. अचानक एक बंदुकीची गोळी तिच्या बाजूच्या भिंतीवर (काँक्रिटवर) आदळली अन् नंतर शालूच्या डाव्या हाताला चाटून खाली पडली. तिला खरचटल्यासारखे झाले. शेजाऱ्यांना हा प्रकार माहीत होताच उलटसुलट चर्चेला उधाण आले. बंदुकीच्या गोळीने बालिका जखमी झाल्यापासून तो हिंगणा-एमआयडीसीत गोळीबार झाल्यापर्यंतची अफवा पसरली. दुपारी ४ पर्यंत पोलिसांनाही ते माहीत नव्हते. पत्रकारांच्या चौकशीनंतर पोलिसांनी शोधाशोध केली. मात्र, मुलीच्या पालकांनी तक्रार देण्यास नकार दिला. रात्री ९ वाजेपर्यंत केवळ प्राथमिक नोंदीपर्यंतच हे प्रकरण मर्यादित राहिले.
राज्य राखीव दलाच्या जवानांकडून केल्या जाणाऱ्या गोळीबाराच्या सरावादरम्यान गोळी सुटून इकडे आली असावी, असा अंदाज वर्तविला जात होता. पोलिसांकडेही याबाबत ठोस माहिती नव्हती. (प्रतिनिधी)