मद्यप्रेमींसाठी खूषखबर! आता मद्याच्या घरपोच विक्रीला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 09:30 PM2021-04-26T21:30:46+5:302021-04-26T21:31:57+5:30
Coronavirus in Nagpur मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आता शहरातील बीअरसोबतच देशी-विदेशी दारूची विक्री घरपोच ऑर्डरवरच होईल. मात्र, ही होम डिलिवरी रात्री ८ वाजेपर्यंतच असेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आता शहरातील बीअरसोबतच देशी-विदेशी दारूची विक्री घरपोच ऑर्डरवरच होईल. मात्र, ही होम डिलिवरी रात्री ८ वाजेपर्यंतच असेल. परमिटधारकांना आणि अस्थायी परमिटधारकांनाही मद्य मिळणार आहे.
मागील काही दिवसांपासून फक्त बीअरबारसाठीच होम डिलिवरी पद्धतीने एमआरपी दरावर मद्यविक्रीला परवानगी होती. मात्र, काही बीअरबार संचालकांनी दरापेक्षा अधिक रक्कम आकारून विक्री केली होती. तक्रारीनंतर अशा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले होते. वाइन शॉप आणि देशी दारूच्या विक्रीला परवानगी नव्हती. सोमवारी २६ एप्रिलला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी अन्य परमिटधारक वॉइन शॉप आणि देशी मद्य विक्रेत्यांनादेखील नियमांचे पालन करून होम डिलिवरी मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. विक्रेते फक्त परमिटधारक ग्राहकांना विक्री करू शकतील. ज्यांच्याकडे परमिट नसेल त्यांना अस्थायी परमिट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्याची असेल.
या कामासाठी विक्रेत्यांना आवश्यकतेनुसार डिलिवरी बॉय ठेवावे लागतील. मात्र, यांची संख्या १० पेक्षा अधिक असणार नाही. त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेले ओळखपत्र असणे आवश्यक राहील. कोणत्याही स्थितीमध्ये एका डिलिवरी बॉयकडे २४ पेक्षा अधिक युनिट (बाटल्या) असता कामा नये. विक्रेत्यांना होम डिलिवरी विक्रीसंदर्भात माहिती एका रजिस्टरवर नोंदवावी लागेल. ग्राहकांनी अधिकच्या दरात मद्य विकणे, दुकानात रांगा लावून मद्य विकणे असे प्रकार आढळल्यास दुकानदारांवर कारवाई केली जाणार आहे.