गुड न्यूज! उद्या आकाशात ढग, परवा जाेराचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 11:19 AM2023-06-21T11:19:14+5:302023-06-21T11:20:52+5:30
नागपूरकरांना उबविणाऱ्या उकाड्याने त्रासविले : पारा ४१.४ अंशांवर
नागपूर : चटके देणाऱ्या उन्हाच्या झळा आणि उबविणाऱ्या दमट उकाड्याने नागपूरकरांना हैराण करून साेडले आहे. मंगळवारीही ४१.४ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली, जे सरासरीपेक्षा ६.३ अंशांनी अधिक हाेते. त्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा नागपूरकरांना लागली आहे. मात्र, ही प्रतीक्षा संपणार आहे. हवामान खात्याकडून तशी ‘गुड न्यूज’ आली आहे. २२ जूनला आकाश ढगांनी व्यापणार असून, वादळ व विजांच्या कडकडाटांसह हलका पाऊस हाेईल. पण, त्यानंतर २३ राेजी जाेरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. तत्पूर्वी आणखी एक दिवस लाेकांना उकाडा सहन करावा लागेल.
हवामान विभागानुसार सध्या दक्षिण-पश्चिम मान्सून पूर्वाेत्तर राज्यांकडे वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनची रेषा ११ जूनपासून आतापर्यंत एकाच स्थळी थांबली आहे. आनंदाची बाब म्हणजे आता मान्सून पश्चिम मध्य व दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरातून हाेत आंध्रप्रदेशच्या सीमावर्ती भागात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार हाेत आहे, ज्यामुळे मध्य भारतात आर्द्रता प्रवेश करू शकते. सायक्लाेनिक सर्क्युलेशनसह कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण-पश्चिम उत्तरप्रदेश आणि राजस्थानकडे तयार हाेत आहे. अरबी समुद्रातही हालचाल दिसून येत आहे. त्यामुळे वातावरण बदलेल आणि वेगावान वाऱ्यासह पाऊस हाेईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पारा ४० अंशांच्या खाली घसरेल आणि उकाड्यापासून दिलासा मिळेल.
साधारणपणे जूनच्या सुरुवातीपासून कमाल तापमान खाली घसरत असते आणि जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात मान्सून किंवा मान्सूनपूर्व पावसाच्या सरी येत असतात. मात्र, यंदा जूनच्या सुरुवातीपासून पारा ४१ ते ४२ अंशांवर कायम आहे. उन्हाच्या झळा व दमट उकाड्याने नागरिकांना त्रासवून साेडले आहे. मंगळवारीही तापमान ६ अंशांच्या वर हाेते व उष्ण लाटेची स्थिती कायम हाेती. विदर्भाच्या इतर जिल्ह्यांतही पारा सरासरीपेक्षा ५ ते ८ अंशांच्या वर आहे. ४२.२ अंशांसह चंद्रपूर सर्वाधिक उष्ण आहे. बुलढाणा, वाशिम, यवतमाळ वगळता इतर जिल्ह्यांत पारा ४० अंशांच्या वर नाेंदविण्यात आला.
मान्सूनपूर्व हालचाली कमजाेर
वातावरणात आर्द्रतेचा स्तर कमी असल्याने मान्सूनपूर्व हालचाली कमजाेर पडल्या आहेत. सध्या आर्द्रतेचा स्तर ५० टक्क्यांवर असून सायंकाळी ताे ३० टक्क्यांपर्यंत खाली येताे. त्यामुळे रात्रीही उष्ण वाऱ्याचा प्रभाव जाणवताे. यामुळेच मंगळवारी रात्रीचा पारा २९.४ अंश नाेंदविण्यात आला, जाे सरासरीपेक्षा ४ अंशांनी अधिक आहे. त्यामुळे रात्रीही उकाड्याचा त्रास जाणवताे.