खुशखबर! खाद्यतेल झाले स्वस्त, सामान्यांना दिलासा; सोयाबीन तीन वर्षांआधीच्या स्तरावर
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 14, 2024 10:16 PM2024-05-14T22:16:11+5:302024-05-14T22:17:06+5:30
तीन महिन्यांपासून घसरण, आता ११० रुपये किलो
मोरेश्वर मानापुरे, नागपूर: दैनंदिन वापरातील जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढल्यामुळे नागपूरकरांना महागाईचा चांगलाच चटका जाणवत आहे. मात्र, दुसरीकडे खाद्यतेलांचे दर कमी झाल्यामुळे वाढत्या महागाईतही सामान्यांना अल्प दिलासा मिळत आहे. सोयाबीन खाद्यतेलाचे दर तीन वर्षांआधीच्या स्तरावर आले आहेत. सर्वाधिक विक्रीच्या सोयाबीन खाद्यतेलाच्या १५ किलोच्या डब्यामागे काही महिन्यांपासून ३०० रुपयांची घसरण झाली. किरकोळमध्ये प्रति किलो भाव ११० रुपयांवर आहेत. तर शेंगदाणा तेल १७० रुपयांपर्यंत उतरले आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे तेलाच्या किमतीत वाढ झालेली नाही. शिवाय जून अखेरपर्यंत लग्नकार्य नसल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. सद्यस्थितीला खाद्यतेलांची मागणी कमी झाल्याने दर घसरल्याचे इतवारीतील राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल यांनी सांगितले.
केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, पाम या तेलाची आयात वाढली. शिवाय यंदा देशांतर्गत सर्व तेलबियांचे उत्पादन वाढले आहे. शिवाय विदेशातील उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. मलेशिया, इंडोनिशियात पाम, ब्राझील, कॅनडा, अर्जेटिनामध्ये सोयाबीन आणि रशिया व युक्रेन देशात सूर्यफूलाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. त्यामुळेच खाद्यतेलाचे दर घसरून तीन वर्षांच्या रेकॉर्ड स्तरावर आले आहेत. दुसरीकडे शेंगदाण्याची निर्यात वाढल्यामुळे देशांतर्गत या तेलाचे दर कमी प्रमाणात घसरले.
खाद्यतेलाचा किरकोळ भाव तक्ता:
खाद्यतेल सध्याचे भाव तीन महिन्यापूर्वीचे भाव
- सोयाबीन ११० १२०
- सूर्यफूल १२० १३०
- राईस ब्रान ११० १२०
- पाम ११० १२५
- मोहरी १४० १५०
- जवस १२० १३०
- शेंगदाणा १७० १७५