नागपूर - गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी खुष खबर ! विशेष रेल्वे गाड्यांची मुदत वाढली
By नरेश डोंगरे | Published: September 21, 2023 05:05 PM2023-09-21T17:05:33+5:302023-09-21T17:05:52+5:30
तीन महिने, ५२ फेऱ्यांमध्ये वाढ
नागपूर : नागपूर - गोवा - नागपूर मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खूष खबर आहे. या गाड्यांच्या मुदतीसोबतच जाण्या-येण्यासाठी मध्य रेल्वेकडून तब्बल ५२ फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत.
विविध मार्गावर रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने सहा विशेष रेल्वेगाड्यांना नियोजित मुदतीनंतरही चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय त्यांच्या एकूण २१२ फेऱ्याही वाढविल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.
गाडी क्रमांक ०११३९ नागपूर - मडगाव (गोवा) विशेष द्वि-साप्ताहिक रेल्वे गाडी आधी ३० सप्टेंबरपर्यंत चालणार होती. ती आता ३० डिसेंबरपर्यंत धावणार आहे. या कालावधीत तिच्या २६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
त्या प्रमाणे मडगाव - नागपूरच्याही ३१ डिसेंबरपर्यंत २६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
ट्रेन नंबर ०१०२५ / ०१०२६ दादर बलिया दादर त्री साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या एकूण ६८ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ही गाडी आता ३ जानेवारी २०२४ पर्यंत धावणार आहे. ०१०२७/ ०१०२८ दादर गोरखपूर दादर आठवड्यातून ४ दिवस धावणाऱ्या या दोन्ही गाड्यांची मुदत २ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात आली असून या कालावधीत या दोन्ही गाड्यांच्या एकूण ९० फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
दुसरा कोणता बदल नाही
प्रवाशांची गर्दी होऊन सणासुदीच्या दिवसांत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्यांची मुदत तसेच फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र, गाड्यांची वेळ, डब्यांची (कोच) रचना तसेच थांबे यात कसलाही बदल करण्यात आला नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.