नागपूर, पुण्याच्या प्रवाशांसाठी गूड न्यूज, आठवड्यातून दोन दिवस समर स्पेशल ट्रेन
By नरेश डोंगरे | Published: April 7, 2024 10:05 PM2024-04-07T22:05:32+5:302024-04-07T22:05:56+5:30
उन्हाळ्यात जवळपास सर्वच मार्गावरच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होते. त्यात १२ महिने प्रवाशांची वर्दळ असलेला मार्ग म्हणजे नागपूर-पुणे-नागपूर आणि नागपूर-मुंबई-नागपूर.
नागपूर : उन्हाच्या तडाख्यासोबतच प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढल्याने पुढच्या काही दिवसांत नागपूरहून पुणे किंवा पुण्याहून नागपूर असा रेल्वे प्रवास करण्याचा बेत ठरविणाऱ्या प्रवाशांना आतापासूनच घाम फुटला आहे. मात्र, त्यांच्यासाठी मध्य रेल्वेने 'गूड न्यूज' दिली आहे. होय, नागपूर-पुणे-नागपूर या मार्गावर १३ एप्रिलपासून द्वि साप्ताहिक स्पेशल ट्रेन चालविण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्यांमध्ये नागपूर-पुणे किंवा पुणे-नागपूर प्रवासाचा बेत आखणाऱ्या प्रवाशांना चांगला दिलासा मिळाला आहे.
उन्हाळ्यात जवळपास सर्वच मार्गावरच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होते. त्यात १२ महिने प्रवाशांची वर्दळ असलेला मार्ग म्हणजे नागपूर-पुणे-नागपूर आणि नागपूर-मुंबई-नागपूर. या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये बाराही महिने प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यात उन्हाळ्याच्या दिवसांत या गर्दीत मोठी भर पडते. परिणामी या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर-पुणे-नागपूर उन्हाळी विशेष (समर स्पेशल) रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
आठवड्यातून दोन वेळा अर्थात सोमवारी आणि शनिवारी ही गाडी धावणार असून, एकूण ३८ फेऱ्या मारून ती प्रवाशांना सेवा देणार आहे.
ट्रेन नंबर ०११६५ नागपूर-पुणे ही विशेष गाडी १३ एप्रिल ते १५ जून या कालावधीत दर सोमवारी आणि शनिवारी रात्री ७:४० वाजता नागपूर स्थानकावरून प्रवासाला निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता पुण्याला पोहोचेल. त्याचप्रमाणे परतीची ट्रेन नंबर ०११६६ पुणे-नागपूर ही गाडी १४ एप्रिलपासून प्रत्येक मंगळवारी आणि रविवारी पुण्यातून दुपारी ३:५० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता नागपुरात येईल. या गाडीला एकूण १८ एलएचबी कोच राहणार आहे. त्यात दोन एसी टू टियर, १० एसी थ्री टियर इकॉनॉमी, ५ सामान्य द्वितीय श्रेणी आणि पार्सल, गार्ड ब्रेक व्हॅन तसेच एक जनरेटर कार संलग्न राहणार आहे.
ठिकठिकाणच्या प्रवाशांना लाभ
नागपूर-पुणे-नागपूर मार्गावरील रेल्वे वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड चोरडलाईन आणि उरली रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. त्यामुळे या शहरात राहणाऱ्यांसोबतच आजूबाजूच्या गाव-परिसरातील प्रवाशांनाही या गाड्यांचा फायदा होणार आहे.