मुंबई- नागपूरच्या रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज; चार स्लिपर कोच वाढले

By नरेश डोंगरे | Published: August 17, 2023 10:51 PM2023-08-17T22:51:11+5:302023-08-17T22:51:27+5:30

रेटा यशस्वी, प्रवाशांच्या मागणीला अखेर प्रतिसाद

Good news for passengers on Mumbai-Nagpur railway line; Four slipper coaches were raised | मुंबई- नागपूरच्या रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज; चार स्लिपर कोच वाढले

मुंबई- नागपूरच्या रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज; चार स्लिपर कोच वाढले

googlenewsNext

 नागपूर : हजारो प्रवाशांच्या मागणी, तक्रारी आणि प्रवाशांसोबतच प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधींकडून देण्यात आलेल्या रेट्याला अखेर यश आले. रेल्वे प्रशासनाने १२२८९/१२२९० सीएसएमटी मुंबई- नागपूर- मुंबई दुरांतो एक्सप्रेस या रेल्वेगाडीचे चार स्लिपर कोच वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर- मुंबई- नागपूर मार्गावर धावणाऱ्या दुरांतो एक्सप्रेस या रेल्वेगाडीत वर्षभर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. काही महिन्यांपूर्वी या गाडीचे स्लिपर कोच कमी करून एसी कोच वाढविण्यात आले होते. २३ कोचच्या या गाडीला केवळ दाेन स्लिपर कोच असल्याने सामान्य प्रवाशांची मोठी कुचंबणा होत होती. एक तर जास्तीची रक्कम मोजून एसीत प्रवास करा किंवा दुसरी गाडी, दुसरे साधन शोधा, असा हा मुस्कटदाबीसारखा प्रकार होता. एसीत प्रवास करण्याची प्रत्येकाची आर्थिक स्थिती नसल्याने आणि स्लिपर कोच केवळ दोनच असल्याने हजारो प्रवाशांना स्लिपरचे तिकीटच मिळत नव्हते.

परिणामी, दुरांतो एक्सप्रेसमध्ये स्लिपर कोच वाढवा, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत होती. या मागणीला प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनीही उचलून धरले गेले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी, रेल्वे बोर्डाकडे नियमित पत्रव्यवहारही केला जात होता. ‘लोकमत’नेही या संबंधाने वेळोवेळी प्रवाशांचा आवाज बुलंद केला होता. स्लिपर कोच वाढविण्याच्या मागणीचा रेटा प्रभावी झाल्याने अखेर रेल्वे प्रशासनाने या गाडीचे चार एसी कोच कमी करून चार स्लिपर कोच वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

२२ नोव्हेंबरपासून बदल

नव्या बदलानुसार, थ्री एसीच्या १५ कोचमधून चार कोच कमी होऊन ते ११ वर येणार आहे. तर, दाेन स्लिपर कोचऐवजी आता सहा स्लिपर कोच राहणार आहे. टू एसीचे तीन कोच, वन एसीचा एक कोच आणि दाेन पॉवर कार अशी सुधारित संरचना दुरांतो एक्सप्रेसची राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ नोव्हेंबरपासून होणार आहे.

...म्हणून तीन महिन्यानंतर नवा बदल!

प्रवाशांची गर्दी वाढत असताना नव्या बदलासाठी तब्बल तीन महिन्यांनंतरचा मुहूर्त का निवडला, याबाबत रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांच्याकडे संपर्क केला असता ते म्हणाले, अनेक प्रवासी तीन- चार महिन्यांपूर्वीच आगावू आरक्षण करून ठेवतात. त्यांची संख्या लक्षात घेता हा बदल २२ नोव्हेंबरपासून करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. मानसपुरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Good news for passengers on Mumbai-Nagpur railway line; Four slipper coaches were raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.