रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, मंगळवारपासून मुंबई-नागपूर सुपरफास्ट!
By नरेश डोंगरे | Published: October 1, 2023 03:15 PM2023-10-01T15:15:57+5:302023-10-01T15:16:21+5:30
नागपूर-विदर्भातील मोठ्या संख्येतील प्रवासी नियमित मुंबईला जातात.
नागपूर : मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी गूड न्यूज आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांचे औचित्य साधून मध्य रेल्वेने चार 'वन-वे स्पेशल' चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या चार गाड्यांपैकी दोन गाड्या मुंबई ते नागपूर अशा आहेत. नागपूर-विदर्भातील मोठ्या संख्येतील प्रवासी नियमित मुंबईला जातात.
हवाई प्रवास महागडा असल्याने ते रेल्वे गाडीनेच मुंबई गाठणे पसंत करतात. जाणाऱ्यांसोबतच मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय असते. त्यामुळे वर्षभर मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या अनेक प्रवाशांना रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळत नाही. सणासुदीच्या दिवसांत ही गर्दी आणखीच वाढते. ते लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ०२१३९ क्रमांकाची मुंबई - नागपूर सुपरफास्ट वन वे स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी ३ ऑक्टोबरपासून ही वन-वे सेवा सुरू होईल. ती मध्यरात्री १२.२० ला सुटेल आणि १५ तासानंतर दुपारी ३.३२ वाजता नागपूर स्थानकात पोहचेल. मार्गातील दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे या गाडीचे थांबे राहणार आहेत. या गाडीत १८ स्लीपर क्लास, एक जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार राहणार आहे.
दुसरी गाडी आहे ०२१४१ लोकमान्य टिळक टर्मिनस -नागपूर सुपरफास्ट वन वे स्पेशल ही गाडी बुधवारी मध्यरात्री १२.४५ वाजता सुटेल आणि दुपारी ३.३२ वाजता नागपूर स्थानकात दाखल होईल. मार्गावरील ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर ती प्रवाशांची चढ-उतर करेल. या गाडीत एक एसी टू टियर, दोन एसी थ्री टियर, १३ स्लीपर क्लास आणि ८ जनरल सेकंड क्लास लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. या नव्या सुपरफास्ट गाड्यांमुळे गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांना चांगला दिलासा मिळणार आहे.
सोलापूर आणि कोल्हापूर स्पेशल
नागपूरला उपरोक्त दोन वन वे स्पेशल देण्यासोबतच मध्य रेल्वेने सोलापूर आणि कोल्हापूरसाठीही प्रत्येकी एक वन-वे स्पेशल चालविण्याचा निर्णय घेतला आहे.