सर्वसामान्यांसाठी खुशखबर; तूर डाळ १५ रुपयांनी उतरली !

By मोरेश्वर मानापुरे | Published: July 9, 2024 09:21 PM2024-07-09T21:21:38+5:302024-07-09T21:22:24+5:30

- हंगामाच्या दरापेक्षा महागच : बाजारात घाऊक खरेदी थांबली, भाव आणखी उतरणार

Good news for the general public; Tur dal has dropped by Rs. 15 | सर्वसामान्यांसाठी खुशखबर; तूर डाळ १५ रुपयांनी उतरली !

सर्वसामान्यांसाठी खुशखबर; तूर डाळ १५ रुपयांनी उतरली !

नागपूर : जून महिन्यात तूर डाळीने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यामुळे सर्वसामान्यांची झोप उडाली होती. मात्र, आता त्यांच्यासाठी खुशखबर असून तूर डाळीचे दर उतरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. 

सध्या किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांची घाऊक खरेदी मंदावली आहे. परिणामी तूर डाळीचे दर पंधरा दिवसातच किलोमागे १२ ते १५ रुपयांनी उतरले असून दर्जानुसार १५२ ते १७२ रुपयात विक्री होत आहे. मात्र, तुलनात्मक आकडेवारी पाहता हे भाव फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातील प्रारंभीच्या हंगामापेक्षा प्रति किलो ३० ते ३२ रुपयांनी जास्तच आहेत. सरकारने कठोर कारवाई करून दरवाढीवर नियंत्रण ठेवावे. नाहीतर डाळीचे भाव पुन्हा २०० रुपयांवर पोहोचतील, अशी व्यापाऱ्यांना भीती आहे. 

जून महिन्यातील तेजीमुळे नागपुरातील अनेक दाल मील आणि घाऊक व्यापाऱ्यांनी तूर डाळ टप्प्याटप्प्याने बाजारात विक्रीसाठी आणली. त्यामुळे ग्राहकांना जास्त भावात खरेदी करावी लागली. सध्या साठेबाजांकडे हजारो क्विंटल तूर डाळ पडून आहे. आता हेच साठेबाज कमी भावात बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. 
हरभरा डाळीच्या दरात ६ ते ७ रुपयांची घसरणतूर डाळीसह हरभरा डाळीचे दरही प्रति किलो ६ ते ७ रुपयांनी उतरले असून महिन्याआधीच्या ८२ ते ८८ रुपयांच्या तुलनेत ७५ ते ८१ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

किरकोळ दुकानदारांची जास्त भावातच विक्री
तूर डाळ आणि हरभरा डाळीचे भाव सध्या कमी झाल्यानंतरही किरकोळ दुकानदार दोन्ही डाळींची जून महिन्यातील जास्त दरातच विक्री करीत आहेत. ग्राहकांना दरकपातीचा अंदाज नसल्यामुळे ते जास्त दरातच खरेदी करीत आहे. याशिवाय गहू आणि तांदळाचे दरही ६ ते १० रुपये किलोने उतरले आहेत.

डाळींचे सध्याचे दर :
डाळ प्रकार एक महिन्याआधीचे दर सध्याचे दर
तूर डाळ १६४-१८७ १५२-१७२
हरभरा डाळ ८२-८८ ७४-८१

भाव आणखी उतरणार
दाल मील, कंपन्या आणि घाऊक व्यापाऱ्यांकडे तूर डाळीचा मोठा साठा आहे. बाजारात ग्राहकांचा अभाव आणि सण नसल्यामुळे विक्री कमी झाली आहे. शिवाय यंदा तूरीसह सर्वच कच्च्या मालाचे बंपर उत्पादन होण्याच्या कृषीतज्ज्ञांच्या अंदाजामुळे साठेबाज, मोठ्या कंपन्या आणि घाऊक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पुढे धान्य आणि कडधान्याचे भाव आणखी कमी होतील आणि ग्राहकांना दिलासा मिळेल.
रमेश उमाटे, धान्य व्यापारी, कळमना न्यू ग्रेन मार्केट.

Web Title: Good news for the general public; Tur dal has dropped by Rs. 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर