गृहमंत्रालयातून गूड न्यूजची तयारी; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी लवकरच जाहीर होणार

By नरेश डोंगरे | Published: September 11, 2022 09:32 PM2022-09-11T21:32:55+5:302022-09-11T21:33:56+5:30

चातकासारखी बदल्यांची वाट पहाणाऱ्या आणि वारंवार हुलकावणी मिळत असल्याने नैराश्याच्या मोडमध्ये आलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांकडून कोणत्याही क्षणी गूड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.

good news from ministry of home affairs transfer list of senior police officers will be announced soon | गृहमंत्रालयातून गूड न्यूजची तयारी; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी लवकरच जाहीर होणार

गृहमंत्रालयातून गूड न्यूजची तयारी; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी लवकरच जाहीर होणार

googlenewsNext

नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - चातकासारखी बदल्यांची वाट पहाणाऱ्या आणि वारंवार हुलकावणी मिळत असल्याने नैराश्याच्या मोडमध्ये आलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांकडून कोणत्याही क्षणी गूड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भाने राज्यभरातून गेलेले सर्व अहवाल लक्षात घेता १२ सप्टेंबर किंवा त्यानंतर कोणत्याही दिवशी बदल्यांची यादी जाहिर केली जाऊ शकते. शिर्षस्थ पातळीवरून या माहितीला दुजोरा मिळाला आहे.

२०२० नंतर राज्यात कधी नव्हे एवढा वादग्रस्त विषय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बदलीचा ठरला आहे. बदलीच्या निमित्ताने कोट्यवधींची डील झाल्याचा जोरदार आरोप झाल्याने आणि या आरोपाची केंद्रीय संस्थांकडून कसून चाैकशी झाल्याने गेल्या दोन वर्षांत अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय टांगणीवर ठेवण्यालाच राज्यात प्राधान्य मिळाले. परिणामी एकाच ठिकाणी नियत मुदतीपेक्षा जास्त कार्यकाळ काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांचा तीव्र हिरमोड झाला आहे. 

सेवाकाळ पूर्ण झाल्यामुळे अनेक पोलीस अधिकारी आपल्या ट्रान्सफर ऑर्डची वाट बघत आहेत. मात्र, विशिष्ट राजकीय भूमीकेमुळे बदलीची यादी निघायला तयार नाही. या यादीच्या प्रतिक्षेत अनेक अधिकारी ‘ओव्हर सर्व्हीस ड्यू’ (नमूद कालावधीपेक्षा अधिक सेवा) झाले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणच्या अधिकाऱ्यांची ही स्थिती आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात पहिले गृहमंत्री, अनिल देशमुख यांच्या रुपात दुसरे तर आता परत फडणवीसांच्या रुपात तिसरे गृहमंत्री दिले आहे. त्यामुळे पोलीस दलात नागपूरचे नाव गृहमंत्र्यांचे शहर म्हणूनही घेतले जाते. 

अशा या शहरात काही अधिकाऱ्यांचा सेवाकाळ २०२१ मध्येच पूर्ण झाला. त्यामुळे ते वर्षभरापासून बदलीच्या आदेशाची वाट बघत आहे. नुकतीच गणेशोत्सवाची सांगता झाली. दोन आठवड्यानंतर नवरात्रोत्सव आणि दसऱ्याचा बंदोबस्त सुरू होईल. त्यानंतर हिवाळी अधिवेशन, दिवाळीचाही बंदोबस्त लागेल. परिणामी आता नाही तर एकदम दसरा-दिवाळीनंतरच बदल्यांची यादी काढावी लागेल. ते ध्यानात घेऊन सोमवारी १२ सप्टेंबरपासून पुढच्या कोणत्याही दिवशी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची जंबो यादी जाहिर केली जाणार असल्याचे समजते. खास सूत्रांच्या माहितीनुसार, गृहमंत्रालयातून बदली प्रक्रियेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे गृहमंत्री फडणवीस कोणत्याही क्षणी प्रतिक्षेतील अधिकाऱ्यांना गूड न्यूज देऊ शकतात, असेही सूत्रांचे सांगणे आहे. 

१३ पैकी ९ अधिकाऱ्यांना प्रतिक्षा

उपराजधानीत १० डीसीपी (उपायुक्त) आणि अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त तसेच पोलीस आयुक्त असे एकूण १३ वरिष्ठ अधिकारी आहेत. यापैकी सहआयुक्त अस्वती दोरजे, उपायुक्त चिन्मय पंडित, संदीप पखाले आणि चेतना तिडके हे वरिष्ठ अधिकारी सोडता सर्वांचाच सेवाकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे सर्वांना बदलीच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. काही अधिकारी प्रतिनियुक्तीवरही जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

सिपींना एक्स्टेंशन ?

राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक व्हीआयपींच्या आगमनांची वर्दळ असलेले शहर म्हणूनही नागपूरचे नाव घेतले जाते. त्यामुळे येथे सलग बंदोबस्ताचा ताण असतो. त्यात नागपूरचा वाढता क्राईम रेट पाहता येथे सेवा देण्यास फारसे कुणी उत्सूक नसतात. येथील गुन्हेगारी वाढल्याची ओरड होत असली तरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे प्रयत्न चांगले आहेत. ते लक्षात घेता त्यांना आणखी काही महिने एक्स्टेंशन मिळणार असल्याची माहिती आहे.
 

Web Title: good news from ministry of home affairs transfer list of senior police officers will be announced soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.