गुड न्यूज ! सोन्याचे दर उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:09 AM2019-03-23T11:09:22+5:302019-03-23T11:10:40+5:30
शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे. स्थानिक सराफांकडून सोन्याची मागणी घटली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे. स्थानिक सराफांकडून सोन्याची मागणी घटली आहे. तसेच डॉलरची किंमतही इतर चलनांच्या तुलनेने घसरत होत आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून सोन्याची किंमत घटली आहे. १ मार्च ते २२ मार्चपर्यंत नागपुरात १० ग्रॅम शुद्ध सोन्याच्या किमतीत १,०३५ रुपये तर चांदीत प्रति किलो १४०० रुपयांची घसरण झाली आहे. किमतीत काही दिवस घसरण होईल, पण गुढीपाडव्यानंतर भाव वाढण्याची शक्यता सराफांनी व्यक्त केली.
सराफांनी सांगितले की, १ मार्चला १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ३४,११५ रुपये तर चांदी ४१,१३० रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर भावात निरंतर घसरण सुरू आहे. २० मार्चला सोने ३३,०६० रुपये आणि चांदी ३९०,७३० रुपयांपर्यंत खाली उतरली होती. होळीनंतर २२ मार्चला सोन्यात २० रुपये तर चांदीत १०० रुपयांची वाढ होऊन भाव अनुक्रमे ३३,०८० तर चांदी ३९८३० रुपयांवर पोहोचली. मार्च महिन्यात फार कमी ग्राहक बाजारात खरेदीसाठी येतात. जेव्हा भाव कमी होतात, तेव्हा ग्राहकांना खरेदीची संधी असते, पण भाव कमी होतात, तेव्हा ग्राहक बाजारात येत नाहीत, याउलट भाव वाढू लागताच ग्राहक बाजारात खरेदीसाठी गर्दी करतात, हा सराफांना नेहमीच येणारा अनुभव आहे. सोन्याची खरेदी नेहमीच शुभ समजली जाते. पारंपरिकरीत्या अनेकांचा गुंतवणूक म्हणून सोने खरेदीवर भर असतो. अडचणीच्या काळात सोने मदतीला येते, असा सर्र्वसामान्यांचा समज आहे. भाव वाढल्यामुळे लग्नसमारंभ वा शुभप्रसंगी सोने खरेदीकडे लोकांचा कल दिसून येत आहे. सध्या सोन्याच्या भावात होणाऱ्या चढउतारामुळे गुंतवणूकदार सोने खरेदीपासून दूर जात आहेत. भाव उतरल्यामुळे सोने खरेदीची हीच संधी आहे.
भाव आणखी वाढणार
गेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत यावर्षी मार्चमध्ये सोन्याचे दर ३ हजारांनी महाग आहेत. गेल्यावर्षी सोने ३० हजारांवर होते. फेब्रुवारीच्या अखेरीस ३४ हजारांवर पोहोचलेले सोन्याचे दर आता ३३ हजारांपर्यंत कमी झाले आहे. अर्थात हजार रुपयांची घसरण झाली आहे. हीच स्थिती मार्च महिन्यात दरवर्षीच असते. कारण या महिन्यात बाजारात खरेदीदार फार कमी असतात. गुढीपाडव्यानंतर लग्नसराईत ग्राहक बाजारात येतील तेव्हा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी आताच सोने खरेदी करावे.
- राजेश रोकडे, संचालक, रोकडे ज्वेलर्स.