आनंदाची बातमी : लोककलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 07:18 PM2019-09-03T19:18:11+5:302019-09-03T19:20:05+5:30

लोककलावंतांना मिळणाऱ्या मानधनात दीडपट वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तशी घोषणा करण्यात आली आहे.

Good news: a half-time increase honorarium in respect for folk artists | आनंदाची बातमी : लोककलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ

आनंदाची बातमी : लोककलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देकलेची सेवा करणाऱ्यांमध्ये आनंद : लोकमतने मांडली होती कलावंतांची बाजू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुष्यभर कलेची सेवा करीत लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करणारे लोककलावंत आणि साहित्यिकांसाठी राज्य शासनाकडून आनंदाची बातमी मिळाली आहे. लोककलावंतांना मिळणाऱ्या मानधनात दीडपट वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तशी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वृद्ध कलावंतांमध्ये आनंद पसरला आहे. शासनाकडून या निर्णयाचा अध्यादेश विभागापर्यंत पोहचण्याची प्रतीक्षा कलावंतांना लागली आहे. विशेष म्हणजे लोककलावंतांच्या तुटपुंज्या मानधनाचा प्रश्न लोकमतने सातत्याने मांडला होता, त्यामुळे जिल्ह्यातील कलावंतांनी लोकमतचेही आभार मानले आहे.
शासनातर्फे वृद्ध कलावंतांसाठी शासकीय मानधनाची योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत कलावंतांना दर्जानुसार मानधन दिले जाते. यामध्ये राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या कलावंताला अ दर्जा देऊन २१०० रुपये मानधन आहे. तर राज्य व जिल्हा पातळीवरील ब व क विभागाच्या कलावंतांना अनुक्रमे १८०० व १५०० रुपये दरमहा मानधन देण्याची योजना आहे. मात्र कलावंतांना मिळणारे हे मानधन अत्यंत तुटपुंजे असून यातून कलावंतांच्या वृद्धापकाळात त्यांच्या औषधांचा खर्च भागविणेही कठीण होते. त्यामुळे आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या या कलावंतांना उतारवयात हलाखीचे जीवन सहन करावे लागते. यासाठी राज्यभरातील कलावंतांच्या संघटनांतर्फे आंदोलन व निवेदन देऊन या प्रश्नाबाबत सरकारला जागविण्याचा प्रयत्न केला. नुकतेच विदर्भ शाहीर कलाकार परिषदेतर्फे मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्र्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यानुसार २८ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कलावंतांच्या मानधनवाढीबाबत निर्णय घेऊन त्यामध्ये दीडपट वाढ करण्यात आली. शासनातर्फे जाहीर नव्या निर्णयानुसार अ श्रेणी कलावंतांना ३१५० रुपये, ब श्रेणी कलावंतांना २७०० रुपये तर क श्रेणी कलावंतांना २२५० रुपये मानधन देण्यात येणार आहे. या कलावंतांनी आपले सबंध आयुष्य लोककलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्यात घालविले. संगीत तमाशा, शाहिरी पोवाडे, लावणी, प्रबोधनकार, देवीचा जागर, गोंधळ, डायका, भारुड, नकलाकार, भजन मंडळ, कीर्तनकार, गीत गायक, नृत्य करणारे व विविध वाद्य वाजविण्यात निपुण कलावंत व साहित्यिकांना या मानधनवाढीचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयावर विदर्भ शाहीर कलाकार परिषदेतर्फे अध्यक्ष धर्मदास भिवगडे, जिल्हाध्यक्ष दयाल कांबळे, कळमेश्वर तालुका अध्यक्ष अरुण वाहाणे, वृद्ध कलावंत मानधन समिती सदस्य मनोहर धनगरे, नामदेवराव ठाकरे, वसंता कुंभरे (भंडारा), चुडामण लांजेवार व जगन ठाकरे (गोंदिया), हरिभाऊ कार्लेकर (वर्धा) यांनी आनंद व्यक्त केला आहे.
६० ऐवजी १०० कलावंतांची होणार निवड
लोककलावंतांसाठी आणखी एक आनंदाचा निर्णय शासनाने घेतला आहे. आतापर्यंत मानधनासाठी जिल्ह्यातून ६० कलावंत निवडले जायचे. यावर्षी जिल्ह्यातून ६० ऐवजी १०० कलावंतांची निवड मानधनासाठी करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. दरवर्षी मानधनाच्या निवडीसाठी ३०० ते ४०० कलावंत अर्ज करायचे. मात्र केवळ ६० जणांची निवड होत असल्याने अनेकांची निराशा व्हायची. त्यामुळे जिल्ह्यांची प्रतीक्षा यादीही वाढली होती. १०० कलावंतांच्या निवडीमुळे प्रतीक्षा यादी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातून १०० कलावंतांची निवड करण्यात यावी म्हणून लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला होता.
रखडलेले मानधनही देऊन टाका
गेल्या तीन वर्षापासून निवड झालेल्या लोककलावंतांचे मानधन रखडले आहे. २०१७-१८ मध्ये नव्याने मंजूर झालेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांसह आधीच्या कलावंतांनाही गेल्या तीन वर्षापासून वृद्धापकाळ मानधन मिळाले नसल्याने अभावग्रस्त वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, २०१८-१९ या वर्षाला मानधनासाठी आलेल्या लोककलावंतांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे थकीत असलेले कलावंतांचे मानधन त्वरित निर्गमित करावे, अशी मागणी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेने केली आहे.

 

Web Title: Good news: a half-time increase honorarium in respect for folk artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.