नागपूर शहर पोलिसांसाठी गूड न्यूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:41 AM2018-12-29T00:41:34+5:302018-12-29T00:42:34+5:30
रखरखत्या उन्हाळ्यात तपासाचा ताण घेऊन पोलिसांना आता गरम उन्हाच्या झळा सहन करीत पोलीस ठाण्यात बसावे लागणार नाही. येत्या उन्हाळ्यापासून शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात वातानुकूलित विश्रांती कक्ष निर्माण केले जाणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी तशी घोषणा करून पुढचा उन्हाळा पोलिसांसाठी थंडा थंडा कूल कूल राहणार, अशी गूड न्यूज दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रखरखत्या उन्हाळ्यात तपासाचा ताण घेऊन पोलिसांना आता गरम उन्हाच्या झळा सहन करीत पोलीस ठाण्यात बसावे लागणार नाही. येत्या उन्हाळ्यापासून शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात वातानुकूलित विश्रांती कक्ष निर्माण केले जाणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी तशी घोषणा करून पुढचा उन्हाळा पोलिसांसाठी थंडा थंडा कूल कूल राहणार, अशी गूड न्यूज दिली आहे.
पोलीस नियंत्रण कक्षासमोर, माहिती कक्षाच्या बाजूला असलेल्या पोलीस उपाहारगृहाचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले. वातानुकूलित अशा या उपाहारगृहात बसून नियंत्रण कक्षासह आजूबाजूला कर्तव्यावर असलेल्या १००० ते १२०० पोलिसांना माफक दरात नाश्ता आणि जेवणाची सोय उपलब्ध आहे. या उपाहारगृहाच्या फलकाचे अनावरण पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त बी.जी. गायकर तसेच बहुतांश पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर होते. उपाहारगृह वातानुकूलित करण्यात आले. मात्र, पोलीस ठाण्यात गरमागरम वातावरण असते. ते ध्यानात घेता आयुक्तांनी आपल्या खास मिश्किल शैलीत शहरातील सर्व पोलीस ठाण्यात उन्हाळा सुरू होण्यापूर्वी वातानुकूलित विश्रांती कक्ष उपलब्ध करून देण्यात येईल, असे जाहीर केले. ते ऐकून सर्व ठाणेदारांनी टाळ्यांचा गजर केला. या कार्यक्रमानंतर आयुक्तांनी माहिती कक्ष, नियंत्रण कक्ष परिसरात सदिच्छा भेट देऊन तेथील पाहणी केली.
सुमधूर बॅण्ड आणि खुमासदार निवेदन
या छोटेखानी कार्यक्रमाची दोन खास वैशिष्ट्ये होती. त्यातील एक म्हणजे, नागपूर शहर पोलीस दलाचा बॅण्ड. आयुक्तांनी कार्यक्रमस्थळी हजेरी लावताच बॅण्ड पथकाने अनेक सुमधूर गीतांची तार छेडली. तर, पोलीस उपायुक्त यांनी आपल्या खास शैलीत कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन करून अनेकदा उपस्थिांच्या टाळ्या आणि दाद मिळवली. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.