विदर्भातूनही चांगली बातमी, थम्स अप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 10:26 PM2021-05-08T22:26:12+5:302021-05-08T22:34:00+5:30
CoronaVirus Good news from Vidarbha कोरोनाचा वेग मंदावत असल्याचे दिलासादायक चित्र पूर्व विदर्भात निर्माण झाले आहे. नागपूर विभागात वर्धा जिल्हा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यात शनिवारी बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे, हे विशेष. नागपूर जिल्ह्यात तब्बल ३२ दिवसानंतर शनिवारी बाधित रुग्णांची संख्या चार हजाराच्या खाली आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वेग मंदावत असल्याचे दिलासादायक चित्र पूर्व विदर्भात निर्माण झाले आहे. नागपूर विभागात वर्धा जिल्हा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यात शनिवारी बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे, हे विशेष. नागपूर जिल्ह्यात तब्बल ३२ दिवसानंतर शनिवारी बाधित रुग्णांची संख्या चार हजाराच्या खाली आली आहे. शनिवारी एकूण ३,८२७ रुग्ण बाधित झाल्याचे आढळून आले. तर तब्बल ७,७९९ रुग्ण बरे झाले. तसेच भंडारा जिल्ह्यात शनिवारी ५४८ नवीन कोराेना रुग्ण आढळून आले असून १,२५९ रुग्ण बरे झाले. चंद्रपूर जिल्ह्यात १,१६० रुग्ण आढळून आले तर २००१ रुग्ण बरे झाले. गोंदियामध्ये ३१० रुग्ण आढळून आले तर ५८७ रुग्ण बरे झाले. तसेच गडचिरोली जिल्ह्यात ४३१ रुग्ण आढळून आले तर ५२८ रुग्ण बरे झाले. शनिवारचा दिवस हा पूर्व विदर्भासाठी दिलासा देणारा ठरला.
नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात रुग्ण व मृत्यूच्या संख्येचे जुने विक्रम मोडीत निघाले. २४ एप्रिल रोजी ७,९९९ रुग्णांची नोंद होऊन रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला. त्यानंतर सहा ते सात हजार दरम्यान रुग्णसंख्या स्थिरावली. ३ मेपासून दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजाराखाली आली. सर्वाधिक कमी रुग्णसंख्येची नोद ६ एप्रिल रोजी झाली होती. ३,७५८ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येत घसरण झाल्याचे दिसून आले. शनिवारी २०,२३५ चाचण्या झाल्या. यात १७,१०७ आरटीपीसीआर तर ३,१२८ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर १८.१९ टक्के होता.
शहरात २०१६ तर, ग्रामीणमध्ये १७९७ रुग्ण
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २०१६ तर ग्रामीणमधील १७९७ रुग्णांचा समावेश होता. मृतांमध्ये शहरातील ५१ तर ग्रामीणमधील १६ मृत्यू होते. शहरात आज १४,७५६ तर ग्रामीणमध्ये ५,४७९ चाचण्या झाल्या. शहराच्या तुलनेत ग्रामीणमधील पॉझिटिव्हिटीचा दर मोठा असल्याने या भागात चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आठवडाभरात ३१,६०८ रुग्ण तर, ५८२ मृत्यू
मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात रुग्ण व मृत्यूसंख्येत मोठी घट आल्याचे दिसून येत आहे. १८ ते २४ एप्रिल दरम्यान रुग्णांची संख्या ५८,१८९ तर मृतांची संख्या ७४८ होती. २५ एप्रिल ते १ मे या आठवड्यात ४७,९४६ रुग्ण व ६५१ मृत्यू नोंदविण्यात आले होते. २ ते ८ मे या आठवड्यात ३१,६०८ रुग्ण व ५८२ मृत्यूची नोंद झाली आहे.
आठवड्याची स्थिती
१८ ते २४ एप्रिल : ५८,१८९ रुग्ण : ७४८ मृत्यू
२५ एप्रिल ते १ मे : ४७,९४६ रुग्ण : ६५१ मृत्यू
२ ते ८ मे : ३१,६०८ रुग्ण : ५८२ मृत्यू
कोरोनाची गुरुवारची स्थिती
दैनिक चाचण्या : २०,२३५
एकूण बाधित रुग्ण : ४,४५,९७१
सक्रिय रुग्ण : ५८,२४५
बरे झालेले रुग्ण : ३,७९,६५७
एकूण मृत्यू : ८,०६९