गाडीमध्ये माल ८० किलोचा, आरटीओचा दंड तब्बल ४४ हजारांचा; मालवाहतूक केली ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 08:27 PM2022-02-11T20:27:15+5:302022-02-11T20:31:08+5:30
Nagpur News शुक्रवारी १५० मालवाहतूकदारांनी कळमना मंडीत निदर्शने करीत मालवाहतूक बंद ठेवली.
नागपूर : कळमना मार्केटच्या गेटवरच आरटीओ अधिकारी उभे राहून छोट्या मालवाहतूकदारांवर ओव्हरलोडची कारवाई करीत आहेत. या कारवाईत दंडाची रक्कमही ४० हजारावर आहे. त्यामुळे लहान मालवाहतूकदार संतप्त झाले असून, शुक्रवारी १५० मालवाहतूकदारांनी कळमना मंडीत निदर्शने करीत मालवाहतूक बंद ठेवली.
नागपूरच्या ग्रामीण भागातून भाजीपाला, फळे घेऊन शहरातील कळमना मंडीत माल घेऊन येणारे हे मालवाहतूकदार आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून आरटीओकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे मालवाहतूकदार त्रस्त आहेत. आरटीओचे अधिकारी ८० किलोच्या मालासाठी ४४ हजार रुपये दंड आकारत असल्याचे मालवाहतूकदारांचे म्हणणे आहे. शुक्रवारी या मालवाहतूकदारांनी कळमना परिसरात आपल्या गाड्या उभ्या करून आंदोलन केले. आरटीओकडून होत असलेली मनमानी कारवाई थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
अंडरलोड वाहतूक परवडणारी नाही
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असताना मालवाहतुकीचा दर अत्यल्प आहे. अंडरलोडमध्ये मालाची वाहतूक करणे हे परवडणारे नसल्याचे मालवाहतूकदारांचे म्हणणे आहे. त्यातही मिळणाऱ्या भाड्यापेक्षा दंडात्मक रकमेने आमची कंबर तोडली आहे.
कळमन्यातून उचलला नाही माल
मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी मंडीत खेड्यापाड्यातून माल आला. परंतु हा माल शहरातील विविध छोट्या-मोठ्या बाजारात पोहोचविण्यास अडचण झाली. मालवाहतूकदारांनी मालाची वाहतूक करण्यास नकार दिल्याने व्यापाऱ्यांनी खासगी वाहने लावून माल नेला.
आरटीओंना देणार निवेदन
आरटीओच्या अधिकाऱ्यांनी लहान मालवाहतूकदारांवर कारवाई करू नये, अशी आंदोलकांची मागणी होती. यासंदर्भात आरटीओच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे मनसेचे प्रकाश सोनटक्के, मंगेश शिंदे, पवन शाहू यांनी सांगितले.