गुगलही नाकारू शकला नाही गुरुची महती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:12 AM2021-09-05T04:12:03+5:302021-09-05T04:12:03+5:30

कोरोनाने शाळा लॉक केल्या पण गुरुमुळे शिक्षण थांबले नाही : शिक्षक दिन विशेष नागपूर : पूर्वीच्या विद्यार्थ्याला एखादा प्रश्नाचे ...

Google could not deny the importance of Guru | गुगलही नाकारू शकला नाही गुरुची महती

गुगलही नाकारू शकला नाही गुरुची महती

Next

कोरोनाने शाळा लॉक केल्या पण गुरुमुळे शिक्षण थांबले नाही : शिक्षक दिन विशेष

नागपूर : पूर्वीच्या विद्यार्थ्याला एखादा प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गुरुशिवाय पर्याय नसायचा. पण इंटरनेटच्या दुनियेतील गुगलने अशी किमया केली की आताचे विद्यार्थी गुगलला गुरु मानू लागले. शिक्षणाच्या क्षेत्रात केजीपासून पीजीपर्यंत सर्वच काही गुगलजवळ आहे. जुन्या शिक्षकांचे ई-नॉलेज कमी असले तरी कोरोनात बंद पडलेले वर्ग ऑनलाईन चालविण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते स्वत: विद्यार्थी बनलेत. ई-नॉलेज घेतले आणि अशा प्रतिकूलतेतही आपले गुरुत्व सिद्ध केले.

भारतात कोरोनाचे आगमन झाल्यावर शाळा बंद पडल्या आणि अजूनही बंदच आहेत. आता शाळाच नाही तर शिक्षक कसा राहणार? विश्वकोश समजणारा गुगल, शिक्षकांना संपवणार तर नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. गुगलने दिले सर्वच आहेत, पण त्याची उपयुक्तता कुठे कधी आणि कशासाठी हे योग्यरीत्या शिक्षकांशिवाय सांगणारी दुसरी व्यक्ती नाही.

- यांनी विद्यार्थी बनून स्वत: ला करून घेतले अपडेट ()

रविनगरातील सी.पी. ॲण्ड बेरार हायस्कूलमधील कृष्णा रंदई हे शिक्षक ३१ वर्षापासून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनी भरलेला वर्ग, काळा फळा आणि पांढरा खडू, पूर्वी वर्गात एक केन ही घेऊन यायचे. पण त्याला व्यवस्थेने लगाम लावला आहे. दीड वर्षाहून अधिक झाले त्यांचा वर्गच भरला नाही. शाळेने त्यांना ऑनलाईन वर्ग घेण्यास सांगितले. त्यांच्याकडे ॲण्ड्रॉईड मोबाईल आहे पण वापर व्हॉट्सॲप, इनकमिंग आणि आऊटगोर्ईंग इतकाच मर्यादित. त्यामुळे सरांनी शाळेतील ज्युनिअर शिक्षकांकडून, मुलांकडून ऑनलाईन क्लास, गुगल मीट, झूम मीट, गुगल फॉर्म तयार करणे, ऑनलाईन परीक्षा घेणे यासर्व बाबी अवगत करून स्वत:ला अपडेट केले. आता त्यांचा वर्ग मोबाईलमध्ये भरतोय.

- यांनी घरीच थाटली क्लासरूम

महानगर पालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी प्राथमिक शाळेच्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट या टेक्नोसॅव्ही होत्याच. पण त्यांनी ऑनलाईन शिक्षण कसे रिअलॅस्टीक होईल यासाठी ॲप्सचा उपयोग केला. शाळेमध्ये इंटरनेट व वायफाय कनेक्टिव्हीटी मिळत नसल्याने घरातच एक सेटअप तयार केले. त्या सेटअपद्वारे विज्ञानाचे ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यासाठी कसे रंजक व लगेच अवगत होईल याचे प्रयोग केले. आज महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या आधारे उत्तमप्रकारे अध्ययन करीत आहे.

- १४० वर्गखोल्या केल्या डिजिटल

हुडकेश्वर येथील सेंट पॉल शाळेचे संचालक राजाभाऊ टांकसाळे यांनी अख्खी शाळाच डिजिटल करून कोरोनाच्या परिस्थितीवर मात केली. कोरोनामुळे विद्यार्थी घरी असला तरी त्यांची शाळा नियमित भरत आहे. त्यांनी शाळेतील १४० वर्गखोल्यांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध केले. प्रत्येक वर्गात कॅमेरा, कम्प्युटर, ऑनलाईन यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. डिजिटल बोर्डाचा आधार अध्यापनात केला. काळानुरूप हे बदल केले नसते तर शाळाच चालवू शकलो नसल्याचे ते सांगतात.

Web Title: Google could not deny the importance of Guru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.