गुंड बाबू बकरी म्हणतो...‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 08:10 AM2022-11-22T08:10:00+5:302022-11-22T08:10:01+5:30
Nagpur News नागपूर पोलिसांनी अपराधमुक्त नागपूर अशी मोहीम हाती घेतली असताना गुन्हेगारच पोलिसांच्या मोहिमेला वाकुल्या दाखवत असल्याचे चित्र आहे.
नागपूर : नागपूर पोलिसांनी अपराधमुक्त नागपूर अशी मोहीम हाती घेतली असताना गुन्हेगारच पोलिसांच्या मोहिमेला वाकुल्या दाखवत असल्याचे चित्र आहे. हत्येचा आरोपी असलेल्या एका अटकेतील गुंडाची पोलिसांच्या वाहनातील एक ‘व्हिडीओ क्लिप’ प्रचंड व्हायरल झाली आहे. यात त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही भीती जाणवत नसून ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’ असे म्हणत तो सरळ सरळ पोलिस यंत्रणेला आव्हान देताना दिसतो आहे. ही ‘क्लिप’ पाहिल्यानंतर गुन्हेगारांवर नागपूर पोलिसांचा वचक आहे की नाही, असा प्रश्नच उपस्थित होत आहे.
पाचपावलीतील कुख्यात गुन्हेगार विरेंद्र ऊर्फ बाबू बकरी रामगडिया याने १३ नोव्हेंबरच्या रात्री अश्विन ऊर्फ गुड्डू इंदूरकर आणि येशुदास उर्फ शॅंकी परमार या साथीदारांच्या मदतीने प्रतिस्पर्धी रोहन बिऱ्हाडे यांची हत्या केली. बाबूचे प्रतिस्पर्धी सौरभ वासनिकसोबत जुने वैर होते. पोलिसांनी सौरभला एमपीडीएअंतर्गत तुरूंगात पाठवले होते. बाबूने सौरभचा मित्र रोहनची साथीदारांच्या मदतीने हत्या केली. ही घटना अत्यंत गांभीर्याने घेत पोलिस आयुक्तांनी एसीपींना चौकशीचे आदेश दिले. बाबू आणि त्याचे साथीदार हे भयंकर गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर कडक पोलिस पाळत ठेवण्यात आली होती. असे असतानाही त्याने पोलिसांच्या वाहनातच बसून 'व्हिडीओ क्लिपिंग' केली. या क्लिपिंगमध्ये तो एकदम बिनधास्तपणे बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांशी बोलताना दिसतो आहे.
पोलिसांच्या गाडीत बसून तो आपल्या सहकाऱ्यांना सांगतो की, आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल. पोलिसांच्या वाहनाबाहेर उभ्या असलेल्या दोन साथीदारांपैकी एकजण चुटकी वाजवताना 'चाकू मारता ये' असे म्हणतो. कोठडीदरम्यान पोलिसांच्या वाहनात बसून खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगाराची क्लिपिंग अत्यंत गंभीर आहे.
आरोपींना सहज मिळतो खर्रा
यानंतर पोलिसांच्या वाहनात बसून 'भांजे कुछ करना मत, आने के बाद ५० लाख की टीप है' असे म्हणतो. यादरम्यान इतर मित्रही उपस्थित असतात. ते त्याला 'कुछ चाहिये क्या, खर्रा मिला क्या' असे विचारतात सर्व काही चांगले आहे. तो हो म्हणत नवीन जॅकेट दिले असते तर बरे झाले असते, असे उद्गार काढतो.