नागपुरात गँगवॉरमधून दिवसाढवळ्या एकाचा खून; परिसरात तणाव, पोलिस अलर्टवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 03:23 PM2023-01-04T15:23:26+5:302023-01-04T15:29:01+5:30
दोन आरोपींना अटक
नागपूर : नवीन वर्षाची सुरुवातच हत्येने झाल्यानंतर मंगळवारी गँगवॉरमधून परत एक खून झाला आहे. वर्चस्वाच्या लढाईतून कुख्यात गुंड आसिफ ऊर्फ घोडा याचा पुतण्या व भाच्याने शेख फिरोज शेख मोईनुद्दीन (५०) याची हत्या केली. बिडीपेठेतील भारतमाता चौकात भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. परिसरात तणावाचे वातावरण होते व पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकरणात पोलिसांनी गुंड आसिफचा भाचा मो. साकिब मो. सारिक अन्सारी (१९, महेंद्रनगर, टेका) व पुतण्या शेख फैज शेख फिरोज (१८) या दोघांना अटक केली आहे. तर सूत्रधार आसिफ फरार आहे.
मृत फिरोज हादेखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. भारतमाता चौकात त्याचा पानठेला होता. सात वर्षांपूर्वी आसिफ घोडा याने फिरोजच्या भावावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे फिरोजच्या भावाचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यानंतर दोन्ही गटांत वैमनस्य निर्माण झाले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये फिरोजचा भाऊ फारुख याने आसिफवर प्राणघातक हल्ला केला. त्याचा बदला म्हणून घोडा आणि त्याच्या साथीदारांनी फिरोजच्या घरावर हल्ला केला. अशा प्रकारे दोन्ही गटांनी एकमेकांवर अनेकदा हल्ले केले. पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाईदेखील केली होती.
चप्पल शिवायला आला अन् ‘गेम’ झाला
मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास फिरोज चप्पल शिवण्यासाठी पानठेल्यापासून काही अंतरावर गेला होता. त्याचवेळी आरोपी दुचाकीवरून तेथे पोहोचले. एक आरोपी दुचाकीवरच बसला व दुसऱ्याने फिरोजवर धारदार शस्त्राने वार केले. यात फिरोज जागीच कोसळला व आरोपी फरार झाले. या प्रकाराची माहिती मिळताच सक्करदरा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी फिरोजला इस्पितळात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
‘सीसीटीव्ही’तून पटली ओळख
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्याआधारे आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी तत्काळ या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. आसिफ घोडा याच्या सांगण्यावरून त्याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. आसिफ फरारच असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.