गुंडांची आता खैर नाही, पोलीस घालणार वेसण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:40 AM2018-08-02T00:40:45+5:302018-08-02T00:45:12+5:30
शहरातील सक्रिय गुंडांची आता खैर नाही. येत्या काही दिवसात पोलीस शहरातील सक्रिय गुंडांना वेसण घालण्यासाठी कठोर पाऊल उचलणार असून प्रभावी उपाययोजनाही करणार आहेत. नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही बाब स्पष्ट केली. बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सक्रिय गुंडांची आता खैर नाही. येत्या काही दिवसात पोलीस शहरातील सक्रिय गुंडांना वेसण घालण्यासाठी कठोर पाऊल उचलणार असून प्रभावी उपाययोजनाही करणार आहेत. नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही बाब स्पष्ट केली. बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
डॉ. उपाध्याय यांनी सांगितले, गुन्हे शाखा आणि शहर वाहतूक पोलीस हे सर्वात महत्त्वाचे घटक असतात. ते प्रभावी असणे आवश्यक असते. यासाठी जे काही शक्य असेल ते केले जाईल. शहरात काही दिवसांपासून गुंडांवरील नियंत्रणाचे काम थंड पडले आहे. मकोका आणि इतर सराईत गुन्हेगार फरार होऊन गुन्हे करीत आहेत. गोळीबारासारख्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग वाढला आहे. परंतु शहर पोलीस मूकदर्शक बनले आहे. मकोका लागल्यानंतरही गुन्हेगार सक्रिय कसे, असा प्रश्न डॉ. उपाध्याय यांना विचारला असता ते म्हणाले की, त्यांचे धोरण गुंडांना वेसण घालण्याचे आहे. गुंड काहीच करू शकणार नाहीत, अशी परिस्थिती लवकरच निर्माण झाल्याचे लोकांना दिसून येईल. कुठल्याही प्रकरणात योग्य कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असते. गुंडांना वेसण घालण्यासाठी मकोका अतिशय परिणामकारक आहे. त्याचा योग्य उपयोग होणे गरजेचे आहे. अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांचा आश्रय असेल तर त्याच्याविरही निलंबनाची कारवाई केली जाईल. ग्रामीण पोलीसमध्ये कार्यरत असताना त्यांनी हा ‘फॉर्म्युला’ वापरला होता.
गुन्हेगारी रोखण्याच्या उपायांवर चर्चा करताना डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, गुन्ह्यामधील ५ ते १० टक्के लोकं सराईत गुन्हेगार असतात. तुरुंगात कार्यरत असताना कैद्यांना भेटल्यानंतर त्यांना हा अनुभव आला. गुन्ह्यांमधील इतर ९० टक्के लोकांना खऱ्या परिस्थितीची जाणीव नसते. तुरुंगात आल्यानंतर त्यांना त्यांच्या हातून झालेल्या चुकीची जाणीव होते. त्यामुळे अशा लोकांना गुन्ह्यांपासून परावृत्त करण्यासाठी एनजीओची मदत घेतली जाईल. त्यामुळे किमान २५ ते ३० टक्के लोकांमध्ये सुधारणा घडून येते. कॉर्पोरेट समूहही आता सामाजिक जाणिवेतून या क्षेत्रात मदत करीत आहेत. अशा लोकांशी संपर्क केला जाईल.
वाहतूक व्यवस्था सुधारण्यासंदर्भात त्यांनी सांगितले की, कुठल्याही कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसांचा मानवीय चेहरासुद्धा असायला हवा. नियमांचे सक्तीने पालन व्हावे, परंतु त्याचसोबत लोकांना विनाकारण त्रासही होऊ नये, याचेही पालन होणे आवश्यक आहे. पोलिसांचे काम महसूल गोळा करणे नाही. यामुळे त्यांची प्रतिमा प्रभावित होते. वाहतूक व्यवस्था स्मार्ट सिटीप्रमाणे असायला हवी, असेही ते म्हणाले. डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, ते १० वर्षांनंतर नागपुरात परत आले आहेत. यादरम्यान शहरात मोठा बदल झाला आहे. आर्थिक आणि सायबर गुन्हे वाढले आहेत. स्ट्रीट क्राईमही वाढले आहे. पोलीस आणि प्रशासनावरील लोकांचा विश्वास कायम करणे, हीच त्यांची प्राथमिकता असेल. लोकांनी पोलिसांना आपला मित्र समजायला हवे, असेही ते म्हणाले. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त श्यामराव दिगावकर उपस्थित होते.
एका हातात लाठी तर दुसऱ्यात प्रेम
डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, ते ‘एक हात मे दंडा दुजे मे है प्यार, आपको क्या चाहिए बोलो मेरे यार’ या तत्त्वावर काम करणार आहेत. सामान्य नागरिकांशी सौजन्याने तर गुन्हेगारांशी लाठीच्या भाषेतच व्यवहार केला जाईल. पोलिसांसमोर अनेक आव्हाने आहेत. परंतु ते नागरिकांशी कुटुंबाप्रमाणे व्यवहार करतील. येथे आठ वर्षे घालविली आहेत. वाहतूक शाखेचे उपायुक्त ते अप्पर पोलीस आयुक्तापर्यंत त्यांनी या शहरात काम केले आहे. तेव्हा अनुभव आणि संबंधांचा वापर ते नागरिकांच्या सेवेसाठी करतील.
रस्त्यांवर दिसून यावेत पोलीस
डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, पोलीस रस्त्यांवर दिसून यायला हवे. ते सोलापूरला असताना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की, त्यांनी आठवड्यातून दोन दिवस हातात दंडा घेऊन संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण परिसरात फिरणे सुरू करावे. जनसंपर्कामुळे स्थानिक नागरिकांशी संबंध प्रस्थापित होतात. सोलापूर धार्मिक तणावासाठी चर्चेत होते. परंतु पोलिसांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात कुठलाही वाद झाला नाही. लोक स्वत: फोन करून पोलिसांना सतर्क करीत होते. यामुळे स्ट्रीट क्राईमही नियंत्रणात आणता येऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राऊंड स्तरावरील पोलिसिंग यावर त्यांचा विश्वास आहे. नागपूरला क्राईम कॅपिटल समजण्याचे मिथक तोडले जाईल, पोलिसांना बेस्ट पोलीस सेवा दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.