रिक्षाचालकाच्या गळ्याला चाकू लावून गुंडांनी मागितली खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 13:51 IST2021-12-27T13:47:01+5:302021-12-27T13:51:16+5:30
गुंड अनेक दिवसांपासून फैय्याजला खंडणीची मागणी करीत आहेत. फैय्याज दाद देत नसल्याचे पाहून ते चिडले. २४ डिसेंबरच्या रात्री फैय्याज रिक्षा घेऊन जात असताना गुंडांनी त्याला अडवून चाकू गळ्याला लावत खंडणी मागितली.

रिक्षाचालकाच्या गळ्याला चाकू लावून गुंडांनी मागितली खंडणी
नागपूर : खंडणीसाठी दोन गुंडांनी एका रिक्षाचालकाला भर रस्त्यावर मारहाण केली. त्याच्या गळ्याला चाकू लावून दोन दिवसांत खंडणी दिली नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकीही दिली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मोहम्मद फैय्याज मोहम्मद रमाजन (वय २९, रा. हमीदनगर) हे रिक्षा चालवितात. आरोपी अहमद खान रशिद खान आणि नूर आलम अंसारी हे गुंड यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हप्ता वसुली करतात. अनेक दिवसांपासून ते फैय्याजला खंडणीची मागणी करीत आहेत. फैय्याज दाद देत नसल्याचे पाहून ते चिडले.
२४ डिसेंबरच्या रात्री १० च्या सुमारास फैय्याज त्यांचा रिक्षा घेऊन टीपू सुलतान चाैकाजवळून जात असताना आरोपी अहमद आणि नूर आलम दुचाकीने पाठलाग करीत आले. त्यांनी फैय्याजला नुरी मेहबूब मशिदीजवळ रोखले. इतक्या दिवसांपासून तुला हप्ता मागत आहोत, तू का दिला नाही? अशी विचारणा करून आरोपी नूर आलमने मारहाण केली. तर अहमदने चाकू काढून फैय्याजच्या गळ्याला लावला. दोन दिवसांत दोन हजारांची खंडणी दिली नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन आरोपी निघून गेले. फैय्याजने यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी अहमद आणि नूर आलमची चाैकशी केली जात आहे.