नागपूरच्या तकिया धंतोलीत गुंडांचा हैदोस : तरुणावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 11:37 PM2019-02-05T23:37:56+5:302019-02-05T23:39:03+5:30
मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास तकिया धंतोली परिसरात सशस्त्र गुंडांनी प्रचंड हैदोस घातला. दोन तरुणांना घेरून त्यांनी तलवार तसेच चाकूने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. काही गुंडांनी दगडानेही ठेचण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली, त्यामुळे हे गुंड पळून गेले. मात्र, त्यांनी केलेल्या हल्ल्यात अनिकेत किशोर परतेकी (वय २२) तसेच त्याचा अल्पवयीन भाऊ जबर जखमी झाले. धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा थरारक प्रकार घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास तकिया धंतोली परिसरात सशस्त्र गुंडांनी प्रचंड हैदोस घातला. दोन तरुणांना घेरून त्यांनी तलवार तसेच चाकूने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. काही गुंडांनी दगडानेही ठेचण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली, त्यामुळे हे गुंड पळून गेले. मात्र, त्यांनी केलेल्या हल्ल्यात अनिकेत किशोर परतेकी (वय २२) तसेच त्याचा अल्पवयीन भाऊ जबर जखमी झाले. धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा थरारक प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेतसोबत काही दिवसांपूर्वी त्याच्याच वस्तीत राहणारा संदीप नामक गुंडासोबत वाद झाला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी संदीप तसेच त्याचे पाच ते सात साथीदार दारूच्या नशेत टुन्न होऊन मंगळवारी रात्री तकिया धंतोली भागात आले. एकाने अनिकेतला अंधाऱ्या ठिकाणी बोलवून नेले. शंका आल्याने अनिकेतचा लहान भाऊ अभिषेक सोबत गेला. त्याने एका मित्रालाही आवाज दिला. दरम्यान, अंधाऱ्या भागात जाताच अनिकेतला गुंडांनी घेरले. धोका लक्षात येताच अनिकेतने रस्त्यावर पळ काढला. त्याच्या मागे आलेल्या संदीप आणि त्याच्या साथीदाराने तलवारीने त्याच्यावर वार केला. संदीपने दोन्ही हाताने तलवार धरल्याने त्याच्या हाताच्या बोटांना जबर जखम झाली. दुसºया एका आरोपीने मागून चाकू मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनिकेतच्या भावाने चाकू मारणाऱ्यांवर धाव घेतल्याने निसटता घाव बसला. त्यानंतर दोन्ही भावांनी तसेच त्याच्या मित्राने आरडाओरड केल्याने मोठ्या संख्येत आजूबाजूची मंडळी धावली, परिणामी आरोपी पळून गेले. धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडल्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
मोठा अनर्थ टळला
पळून जाण्यापूर्वी आरोपींनी अनिकेत व त्याच्या भावाला बाजूचे दगड फेकून मारले. दरम्यान, शस्त्राचे वार बसल्याने अनिकेत गंभीर जखमी झाला. त्याला धंतोलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती कळताच धंतोलीचा पोलीस ताफा रुग्णालयात पोहचला. वृत्त लिहिस्तोवर कोणत्याही आरोपीला अटक झालेली नव्हती.