गोरेवाडा व अंबाझरी जगाच्या नकाशावर आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2016 03:19 AM2016-03-28T03:19:02+5:302016-03-28T03:19:02+5:30
गोरेवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयासह विविध विभागांनी एकत्र येत एकात्मिक
नागपूर : गोरेवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयासह विविध विभागांनी एकत्र येत एकात्मिक प्रकल्प तयार केला. आज या प्रकल्पाने गती घेतली आहे. त्याच धर्तीवर अंबाझरी तलाव व परिसराच्या विकासासाठी महापालिका, वन विभाग, पर्यटन विभाग आदी विभागांनी एकत्रित येत एकिकृत प्रकल्प तयार करावा. यातून अंबाझरीचा सर्वंकष विकास होईल. येत्या काळात गोरेवाडा व अंबाझरी ही दोन ठिकाणे जगाच्या नकाशावर आलेली दिसतील, असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
वन विभागातर्फे आयोजित अंबाझरी पाणलोट विकास, मृद-जलसंधारण कामाचे भूमिपूजन तसेच जैव विविधता उद्यान विकास कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. अमरावती मार्गावर कमलानगर येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर उपस्थित होत्या. आमदार समीर मेघे, यांच्यासह नगरसेवक परिणय फुके, विभागीय आयुक्त अनूपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, वन विभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षक ए.के.निगम, एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक सर्जन भगत, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)श्री भगवान, प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.एस.के.सिन्हा, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी.एस.रेड्डी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, अंबाझरीच्या पाणलोट क्षेत्रामधील संरक्षित वन भूमीत जैवविविधता उद्यान विकसित करण्याचे चांगले काम वन विभागाने हाती घेतले आहे. ३८ भागांमध्ये या प्रकल्पाची रचना केली असून तेवढी तळीही बांधली जाणार आहेत. विशेष म्हणजे आकाशातून पाहताना तळ्यांची रचना ‘नागपूर’ सारखी लिहिलेले दिसेल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात जलसंधारणाचे काम आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून होत आहे. अंबाझरी नागपूरचे वैभव आहे. नागनदी पुनर्जीवित करण्यासाठी अंबाझरी पाणलोट क्षेत्राचा विकास व त्याचबरोबर मृद जलसंधारण कामाचे संवर्धन आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
जल व वन संपदेचे जतन करा
४आपण निसर्गाच्या सुंदर रचनेचा उपमर्द केला आहे. वैज्ञानिकदृष्ट्या एकात्मिक व्यवस्थापन करुन जलसंपदा आणि वन संपदेचे योग्य नियोजन केल्यास योग्य प्रमाणात पाऊस पडतो. यासाठी मोठ्या प्रमाणावर जलसंपदा आणि वन संपदेचे संवर्धन करा,असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
नगरसेवक फुकेंचे कौतुक
४नगरसेवक परिणय फुके यांनी जैव विविधता उद्यान उभारण्याची संकल्पना मांडली होती. राज्य सरकारतर्फे या चांगल्या कल्पनेचे स्वागत करण्यात आले. या प्रकल्पासाठी फुके यांनी सतत पाठपुरावा केला. त्या संबधीचे प्रस्ताव तयार करून घेतले व आज या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी फुके यांच कामाच्या शैलीचे कौतुक केले.
वन विभागातर्फे आयोजित अंबाझरी पाणलोट विकास, मृद-जलसंधारण काम तसेच जैव विविधता उद्यान विकास कामाचे भुमिपूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोबत नगरसेवक परिणय फुके, महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर व इतर.