गोरेवाडा जंगल सफारी ‘फुल्ल’

By Admin | Published: December 25, 2015 03:42 AM2015-12-25T03:42:33+5:302015-12-25T03:42:33+5:30

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील जंगल सफारीसाठी सध्या पर्यटकांच्या रांगा लागत आहे.

Gorevada Jungle Safari 'FULL' | गोरेवाडा जंगल सफारी ‘फुल्ल’

गोरेवाडा जंगल सफारी ‘फुल्ल’

googlenewsNext

पर्यटकांची गर्दी : नाईट सफारीला प्रथम पसंती
नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील जंगल सफारीसाठी सध्या पर्यटकांच्या रांगा लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अलीकडेच येथील रेस्क्यू सेंटर व जंगल सफारीचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे, येथे देशातील पहिली ‘जंगल नाईट सफारी’ सुरू करण्यात आली असून पर्यटकांची ती प्रथम पसंती ठरत आहे. गुरुवारी दुपारी गोरेवाडा जंगल पर्यटकांनी ‘फुल्ल’ झाले होते.
वन विभागाने येथे जंगल सफारीसाठी तीन वेळा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार पर्यटकांना सकाळी ६ ते १० वाजतापर्यंत, दुपारी ३ ते सायं. ५ वाजतापर्यंत व रात्री ६ ते ८.३० वाजतापर्यंत (नाईट सफारी) ची सुविधा उपलब्ध केली आहे. वन अधिकाऱ्यांच्या मते, सध्या या जंगलात बिबट, चितळ, मोर, सांबर व नीलगार्इंचा अधिवास आहे. याशिवाय येथे विविध प्रजातींचे दुर्मिळ पक्षीसुद्धा पाहायला मिळतात.
अगदी शहराच्या सीमेवर असलेले हे जंगल नेहमीच नागपूरकरांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. मात्र या सोबतच येथे वन कर्मचारी व गाईडचा फार मोठा अभाव जाणवत आहे. त्यामुळे गुरुवारी या जंगलाच्या काटोल रोडवरील प्रवेशव्दारावर सहा-सहा वाहनांसोबत केवळ दोन गाईड पाठविले जात होते. पर्यटकांची येथील वाढती गर्दी लक्षात घेता, एफडीसीएमने येथे सोयी-सुविधा उपलब्ध करणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)

भविष्यात आफ्रिकन सफारी सुरू होणार
राज्य शासनाने मागील २०११ मध्ये विशेष पुढाकार घेऊन, या गोरेवाडा जंगलातील १९१४ हेक्टरमध्ये ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (एफडीसीएम) खांद्यावर देण्यात आली आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची (सीझेडए) मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाच्या मास्टर प्लॅननुसार पर्यटकांना सिंगापूरच्या धर्तीवर देशातील पहिली नाईट सफारी सुरू झाली आहे. याशिवाय भविष्यात आफ्रिकन सफारीचाही येथे आनंद लुटता येणार आहे. सोबतच या प्रकल्पात बर्ड पार्क, एन्टरटेन्मेंट हब, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, अ‍ॅम्ब्युसमेंट पार्क, प्ले झोन, रिसोर्ट व क्लब हाऊसची योजना आहे.

Web Title: Gorevada Jungle Safari 'FULL'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.