पाहुण्या पक्ष्यांनी गजबजला नागपुरातील गोरेवाडा परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:38 AM2019-12-27T11:38:59+5:302019-12-27T11:40:43+5:30
गोरेवाडा बायोपार्कच्या सौंदर्यीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. परिसरात २१६ प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा संरक्षित अभयारण्यासह येथील समृद्ध अशा गोरेवाडा तलाव परिसरात २१६ विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. यापैकी ५० ते ५५ प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांना पक्ष्यांचा जवळून अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गोरेवाडा तलावावरील हे पक्षीवैभव पाहण्यासाठी पर्यटक येथे आकर्षित होत आहेत.
वनविकास महामंडळाच्यावतीने गोरेवाडा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. गोसेखुर्द प्रकल्पामध्ये गेलेल्या वन जमिनीच्या पर्यायी वनीकरणासाठी येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले असून सुमारे २१ किलोमीटर परिसरात वन्य प्राण्यांच्या विविध प्रजातींचे संरक्षण व संवर्धन करण्यात आले आहे.
गोरेवाडा बायोपार्क परिसरात सुमारे १२० वर्षांपूर्वी गोरेवाडा तलावाची निर्मिती सीतागोंडीन यांनी नागपूरच्या पाणीपुरवठ्यासाठी केल्याची नोंद आहे. या तलावासभोवताल मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे वास्तव्य असून स्थलांतरित पक्षी हे या तलावाचे मुख्य आकर्षण आहे.
पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच क्रेस्टेड ग्रेबचे दर्शन
क्रेस्टेड ग्रेब हा पक्षी सुमारे पाच वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच पाहायला मिळाला. यासोबतच रेड क्रेस्टेड पोचार्ड, रुडी सेल्डक, गडवाल, नॉर्थन शॉलर, शेंडीवाला बदक, हूडहूड, रेड स्टार्ट आदी स्थलांतरित पक्ष्यांचेही मोठ्या प्रमाणावर आगमन झाले आहे.
पक्षी अभ्यासकांसाठी अशी आहे सुविधा
पक्षी निरीक्षकांसाठी वन विकास महामंडळातर्फे येथे विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. बायनाकुलर (दुर्बिण) तसेच पक्षी निरीक्षकांसाठी गाईडची व्यवस्थासुद्धा उपलब्ध आहे. यामुळेच पक्ष्यांच्या नावासह त्यांची वीण, वास्तव्याचे ठिकाण आदी सर्व माहिती उपलब्ध होत आहे. तलावाच्या सभोवताल बर्ड हायडर लावण्यात आले आहे. याशिवाय दहापेक्षा जास्त ठिकाणी बर्ड स्टडीची व्यवस्था करण्यात आली आहे. गोरेवाडा परिसरातील समृद्ध वनसंपदेसह तलावावरील पक्ष्यांची माहिती व्हावी, यासाठी अडीच किलोमीटरची नेचर ट्रेल तयार करण्यात आली आहे. सायकलवरुनही नेचर ट्रेल बघण्याची सुविधा आहे. गोरेवाडा बायोपार्कमध्ये नीलगाय, सांबर, ससे, विविध प्रकारची फुलपाखरे, पक्षी, मोर यासह साप, अजगरांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचेही वास्तव्य आहे.
गोरेवाडा बायोपार्कच्या सौंदर्यीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. परिसरात २१६ प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. हिवाळ्यात विदेशी पक्षी या परिसरात वास्तव्याला येतात. त्यामुळे पक्षी निरीक्षणाची सुविधा या प्रकल्पात प्राधान्याने करण्यात आली आहे.
- पांडुरंग पखाले, वन परिक्षेत्र अधिकारी, गोरेवाडा प्रकल्प.