गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त नागपूरच्या आमदार निवासावर चढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 09:01 PM2018-10-19T21:01:27+5:302018-10-20T00:03:21+5:30
आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या आंदोलनाद्वारे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील तब्बल ८५ गावांमधील हजारो गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी नागपुरातील आमदार निवासाला वेढा घातला. शेकडो प्रकल्पग्रस्त इमारतीवर चढले. यामुळे एकच गोंधळ उडाला. दरम्यान आमच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आमदार निवासामधून हटणार नाही, असा संकल्प आ. कडू यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या आंदोलनाद्वारे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील तब्बल ८५ गावांमधील हजारो गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी नागपुरातील आमदार निवासाला वेढा घातला. शेकडो प्रकल्पग्रस्त इमारतीवर चढले. यामुळे एकच गोंधळ उडाला. दरम्यान आमच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आमदार निवासामधून हटणार नाही, असा संकल्प आ. कडू यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या धोरणाची तात्काळ अंमलबजावणी करून धरणात साठवलेला बेकायदेशीर २४४ मी.पर्यंतचा जलसाठा तात्काळ कमी करावा. नव्याने पुनर्वसित करावी लागणारी गावे आणि बाधित गावे व उर्वरित शेती नव्या भूसंपादन कायद्याने संपादित करून आर्थिक मोबदला द्यावा आणि पुनर्वसन करावे. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आश्वासनाची पूर्तता करावी, प्रकल्पग्रस्तांना नोकरी किंवा त्या ऐवजी २५ लाख रुपये रोख रक्कम द्यावी, शेतीचा आणि घराचा आर्थिक मोबदला बोनस स्वरुपात नव्याने द्यावा. वाढीव कुटुंबासाठी सन २०१५ ला १८ वर्षे पूर्ण असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या अपत्यास वाढीव कुटूंब मानून पुनर्वसनाचे संपूर्ण लाभ द्यावे, ३० वर्षाच्या काळ लोटला आहे, मूळ कुटुंबाचे पाचपट कुटुंब झाली आहेत, त्या सर्व कुटुंबांना पुनर्वसनाचे संपूर्ण लाभ देऊन पुनर्वसन करावे, पुनर्वसन गावठाणासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त मानून प्रकल्पग्रस्तांचे संपूर्ण लाभ मिळावे, आपसी वादाने प्रकल्पग्रस्तांच्या घराचे व शेतीचे आर्थिक मोबदला शासन दरबारी अडकले आहेत. या प्रकरणात थेट मोबदला देण्याची व्यवस्था करावी, आंभोरा देवस्थान येथील नागपूर व भंडारा जिल्ह्याला जोडणारा पूल तातडीने बांधावा. तसेच नाग नदीच्या दूषित पाण्यामुळे गोसेखुर्द जलाशयाच्या काठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने याबाबत तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अशा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आहेत. या मागण्यासाठी प्रहार गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी ११ वाजता आमदार निवास ते विभागीय आयुक्त कार्यालय असे महाआंदोलन पुकारण्यात आले होते. यासाठी हजारो प्रकल्पग्रस्त आमदार निवासात एकत्र आले.
आंदोलनकर्ते आधीपासूनच याप्रकरचे आंदोलन करण्याच्या तयारीनेच आले होते. आ. बच्चू कडू हे आगळ्यावेगळ्या आंदोलनासाठी परिचित आहेत, परंतु दसरा आणि अशोक विजयादशमी उत्सवाच्या कामांमध्ये संपूर्ण प्रशासन व पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने त्यांना अशा प्रकारचे काही आंदोलन होईल, याची कल्पनाच नव्हती. या परिस्थितीचा अंदाज आ. कडू यांना आधीच होता. त्यामुळेच त्यांनी कदाचित ही वेळ निवडली.
प्रकल्पग्रस्त दुपारी अचानक इमारतीवर चढून नारेबाजी करून लोकांचे लक्ष वेधले. पोलिसांचा ताफा आमदार निवासात बोलावला गेला. प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. परंतु ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आमदार निवास न सोडण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. आमदार निवासात तब्बल ८५ गावांमधील ६ हजारावर प्रकल्पगस्त रात्री उशिरापर्यंत प्रकल्पग्रस्त ठाण मांडून होते.
अधिकारी दिशाभूल करताहेत
आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यांनी मिटिंग घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. परंतु अधिकारी दिशाभूल करताहेत. प्रकल्पग्रस्त व शेतकºयांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे त्यांना राहायलाच जागा नाही. तेव्हा त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या आमदारांच्या निवासस्थानी प्रकल्पग्रस्त आले आहेत. आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही. प्रकल्पग्रस्तांशी अधिकारी अतिशय वाईट वागताहेत. त्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात.
आ. बच्चू कडू