गोसीखुर्द भूसंपादनाची प्रकरणे सहा महिन्यांत निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 12:34 PM2021-06-30T12:34:08+5:302021-06-30T12:36:36+5:30
Nagpur News गोसीखुर्द धरण भूसंपादनाचा जिल्हानिहाय आढावा घेऊन येत्या सहा महिन्यांत भूसंपादनाची बहुसंख्य प्रकरणे मार्गी लावण्यात येतील, असा विश्वास विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोसीखुर्द धरणात सद्य:स्थितीत ५० टक्के सिंचन क्षमता निर्माण होऊन ८२ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. उर्वरित लक्ष्य गाठण्यासाठी शिल्लक भूसंपादनाचा जिल्हानिहाय आढावा घेऊन येत्या सहा महिन्यांत भूसंपादनाची बहुसंख्य प्रकरणे मार्गी लावण्यात येतील, असा विश्वास विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी व्यक्त केला. यासाठी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत जुलैच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभा कक्षात विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या कामकाजाबाबत मंगळवारी आढावा बैठक घेण्यात आली. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता प्रकाश पवार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राजेश सोनटक्के, गोसीखुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई आदी यावेळी उपस्थित होते.
गोसीखुर्द प्रकल्पाची कामे पूर्ण झाले असून, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ७१८ गावांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत ८५ गावठाणे बाधित आहेत. त्यांचे पुनर्वसन ६३ नवीन गावठाणात करण्यात येणार आहे. त्यापैकी ६१ नवीन गावठाणांसाठी सुविधा निर्माण झाल्या असून, दोन गावांची कामे प्रगतिपथावर आहेत. प्रकल्पातील १४ हजार ९८४ प्रकल्पग्रस्त कुटुंबांपैकी ११ हजार ६७६ कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत.